पाण्यावरील पीएच.डी. व्यवस्थेत आटली!
By admin | Published: March 22, 2016 02:45 AM2016-03-22T02:45:08+5:302016-03-22T02:45:08+5:30
दुष्काळावर राज्यातील राजकारण तापले आहे. टंचाईच्या झळा विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी सोसतो आहे. गावात-वस्तीत
जितेंद्र ढवळे ल्ल नागपूर
दुष्काळावर राज्यातील राजकारण तापले आहे. टंचाईच्या झळा विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी सोसतो आहे. गावात-वस्तीत टँकर वॉर सुरू झाले आहे. दशकभरात टँकर लॉबी श्रीमंत झाली, मात्र पाण्यासाठी सातासमुद्राबाहेर जाऊन पीएच.डी. करणाऱ्या एका जलदूताचे स्वप्न अद्यापही कोरडे आहे. त्याने पाणी वाचविण्यासाठी समाजाला दिलेला संकल्पही आटला आहे.
वर्धा जिल्हा परिषदेत पाणीपुरवठा विभागात अभियंता असताना नरेश सायंकार यांनी पाण्यासाठी गावातील महिलांची पायपीट पाहिली. तंटेही अनुभवले. त्यामुळे अवघा महाराष्ट्र टंचाईमुक्त असावा, असा संकल्प करीत नोकरी सोडली. यानंतर सायंकार यांनी ‘रिचार्जिंग आॅफ ग्राऊंड वॉटर इन इंडिया दि नीड आॅफ दि अवर’ या विषयावर वॉशिंग्टन, अमेरिका येथील आंतरराष्ट्रीय विद्यापीठात संशोधन केले. सायंकार यांचे संशोधन मान्य करीत विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. प्रदान केली. जलसंधारण क्षेत्रात भारतात पहिली पीएच.डी. मिळविण्याचा मान असला तरी, या जलदूताने सांगितलेल्या एकाही गोष्टीचा अंमल समाजाने स्वीकारला नाही; कारण ग्लोबल वॉर्मिंगसोबत आमची व्यवस्थाही आटत चालली आहे! मात्र अजूनही हा जलदूत गावोगावी फिरतो आहे.
जलसंवर्धनासाठी आतापर्यंत चार हजाराहून अधिक गावांची पायपीट करणाऱ्या सायंकार यांचा पॅटर्न ना समाजाने १०० टक्के स्वीकारला ना सरकारने. सायंकार यांनी पावसाच्या पाण्याचे व इतर जलस्रोतांच्या माध्यमातून पुनर्भरण कसे करावे, यासाठी त्यांनी कमी खर्चाचे १० उपाय शोधले आहेत. गावकऱ्यांना लवकर समजावे म्हणून त्याची रेखाटने त्यांनी केली आहेत. त्याचे प्रात्यक्षिकही ते करून दाखवितात. ज्यांनी त्यांचा पॅटर्न स्वीकारला, त्यांना फायदाही झाला. मात्र सरकारी घोडे चालविणाऱ्या अधिकाऱ्यांनी ग्रामपातळीवर याची सक्ती केली नाही. जिथे सक्ती झाली तिथे निधीचे कारण आडवे आले. सायंकार पॅटर्न व्यवस्थेत मुरला.
इतकेच काय तर राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठात ‘जलसंधारण व्यवस्थापन’ अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव सायंकार यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकार आणि राज्यपालांनी या प्रस्तावाला अनुमती दर्शवीत विद्यापीठांनी ‘जलसंधारण व्यवस्थापन’ अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
उन्हाळा लागला की गावाबाहेरील विहिरीवरून गावात टँकरने पाणी आणण्याची प्रथा अवघ्या महाराष्ट्रात आहे. पण गावातील विहिरीत वा बोअरचे पाणी का आटले, असा कुणीही प्रश्न करीत नाही. यासाठी पाणी बचत करावी लागेल, असे सारेच सांगतात. पण मी १० कलमी कार्यक्रम सांगतो. तोही कमी खर्चाचा. माझा प्रयोग फेल ठरला तर पुन्हा पाण्यावर बोलणार नाही. पण एकदा तरी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतने हा प्रयोग स्वीकारावा.
- डॉ. नरेश सायंकार
जलतज्ज्ञ