बॉम्बस्फोटानंतर केला जावयाला फोन अन् ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:08 AM2021-04-21T04:08:32+5:302021-04-21T04:08:32+5:30

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईच्या जीवनवाहिनीत मृत्यूचे तांडव घडवून १८९ जणांचे बळी घेणाऱ्या दहशतवादी कमाल अहमद ...

Phone calls to be made after the bomb blast ... | बॉम्बस्फोटानंतर केला जावयाला फोन अन् ...

बॉम्बस्फोटानंतर केला जावयाला फोन अन् ...

Next

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुंबईच्या जीवनवाहिनीत मृत्यूचे तांडव घडवून १८९ जणांचे बळी घेणाऱ्या दहशतवादी कमाल अहमद अंसारीने नंतर आपल्या जावयाला फोन करून ही माहिती कळविली. तोच धागा पकडून एटीएसने त्याच्या मुसक्या आवळल्या अन् त्याला फाशी यार्डमध्ये पोहचवले. येथे सहा वर्षांपासून सरकारी भत्त्यावर जगणाऱ्या कमालवर कोरोनाने घाव घातला अन् सोमवारी त्याचा किस्सा खतम केला.

गेल्या नऊ दिवसांपासून मेडिकलमध्ये कोरोनाचा उपचार घेत असलेला दहशतवादी कमाल अंसारी (५०) याचा सोमवारी पहाटे १ च्या सुमारास मृत्यू झाल्याने अंगावर शहारे आणणाऱ्या मुंबई स्फोट मालिकेच्या आठवणी पुन्हा एकदा चर्चेला आल्या. इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी ११ जुलै २००६ ला मुंबईच नव्हे, तर देश हादरवला होता. सायंकाळच्या वेळी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये अवघ्या ११ मिनिटांत सात बॉम्बस्फोट घडवून त्यांनी १८९ जणांचे बळी घेतले, तर ८२४ प्रवाशांना जीवघेण्या जखमा दिल्या होत्या. या स्फोटाचा तपास त्यावेळी मुंबई पोलिसांच्या मदतीने दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सुरू केला. तपासासाठी सात पथके नेमली. रॉ तसेच सीबीआयचीही मदत घेण्यात आली होती. तपास पथकांनी सुमारे ४०० जण ताब्यात घेतले. एका प्रेशर कूकर विक्रेत्याने आरोपींचा धागा दिला. त्यानंतर १८ ते २० जुलैला बिहारचा रहिवासी कमाल अहमद अंसारी याच्या तपास पथकाने मुसक्या आवळल्या. साखळी स्फोटाच्या थराराची कथा कमालने त्याचा जावई मुमताज चाैधरीला फोन करून ऐकवली होती. हे टेलिफोनवरील संभाषण हाती लागल्यानेच कमालच्या मुसक्या आवळल्या अन् नंतर एका पाठोपाठ १३ जणांना अटक करण्यात आली. त्यात इंडियन मुजाहिदीनचे काही दहशतवादीही होते.

जिहादच्या नावाने ब्रेन वॉश केल्यानंतर मूळचा बिहारचा रहिवासी असलेला कमाल अहमद अंसारी सैतानच बनला होता. त्यानेच आपल्या साथीदारांच्या माध्यमातून मुंबईच्या जीवनवाहिनीत मृत्यूचे तांडव घडवल्याचे तपास पथकाला सांगितले होते. पुढे मोक्का न्यायालयाने २०१५ मध्ये १३ आरोपींपैकी कमाल अंसारीसह पाच जणांना फाशी, तर सात जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.

----

२०१५ पासून नागपुरात

फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने कमाल अंसारी याला २०१५ मध्येच मुंबईतून नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात हलविवण्यात आले होते. तेव्हापासून तो येथेच होता. त्याला कधी फासावर टांगले जाईल, याबाबत कुणाकडेच माहिती नव्हती. मात्र, कोरोनाने त्याला ९ एप्रिलला विळखा घातला अन् अवघ्या नऊ दिवसांत त्याच्याभोवतीचा पाश घट्ट करीत सोमवारी त्याचा किस्सा खतम केला.

----

Web Title: Phone calls to be made after the bomb blast ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.