प्रेक्षकाने गॅलरीतून काढला सभागृहातील फोटो : सुरक्ष रक्षकांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:37 PM2019-12-19T23:37:25+5:302019-12-19T23:38:36+5:30
विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या एका व्यक्तीने गुरुवारी सायंकाळी सभागृहाचे कामकाज सुरु असताना आपल्या मोबाईलने सभागृहाचा फोटो काढला.
लोकमत न्यूज नटवर्क
नागपूर : विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या एका व्यक्तीने गुरुवारी सायंकाळी सभागृहाचे कामकाज सुरु असताना आपल्या मोबाईलने सभागृहाचा फोटो काढला. माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यावर सुरक्षा यंत्रणेला जाग आली. विधिमंडळातील सुरक्षा रक्षकांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे सभागृहात काही वेळ गोंधळ उडाला.
विधिमंडळाचे सभागृह हे राज्याचे सर्वोच्च सभागृह आहे. राज्याचे कायदे या सभागृहात केले जातात. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, सरकार या सर्वोच्च सभागृहात कसे काम करतात. अधिवेशनदरम्यान विधिमंडळाचे कामकाज कसे चालते, याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. नागरिकांनाही येथील कामकाज पाहता यावे यासाठी सभागृहात प्रेक्षक गॅलरी असते. शाळा कॉलेजचे विद्यार्थीसुद्धा कामकाज पाहण्यासाठी येतात. यासाठी परवानगी घेऊन पास दिली जाते. परंतु या गॅलरीत बसून सभागृहातील कामकाज पाहत असताना प्रेक्षकांसाठी नियम घालून दिले असतात. त्यांचे पालन करणे आवश्यक असते. यामध्ये फोटो काढण्यालाही बंदी आहे.
बुधवारी सायंकाळच्या सुमारास पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरु असताना अचानक एका व्यक्तीने आपल्या मोबाईलद्वारे सभागृहातील कामकाजाचा फोटो काढला. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तालिका अध्यक्ष धर्मराबबाबा आत्राम यांच्यासह सभागृहाचे लक्ष या घटनेकडे वेधले. यावेळी अनेक सदस्यांनीसुद्धा आक्षेप घेतला. प्रेक्षक गॅलरीतील सुरक्षा रक्षकांनी लगेच त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेऊन कारवाई केली.