मेडिकल वसतिगृहासमोर अश्लील वर्तन करणाऱ्याचा मुलींनीच काढला फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:59 PM2019-04-01T22:59:10+5:302019-04-01T23:00:52+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) मुलींच्या वसतिगृहासमोर एक युवक अश्लील वर्तन करीत असताना आढळून आल्याने खळबळ उडाली. काही मुलींनी हिंमत करून त्याचा फोटो काढला. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने सुरक्षेबाबत आढावा घेतला. अजनी पोलिसांकडे हे प्रकरण सोपविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) मुलींच्या वसतिगृहासमोर एक युवक अश्लील वर्तन करीत असताना आढळून आल्याने खळबळ उडाली. काही मुलींनी हिंमत करून त्याचा फोटो काढला. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने सुरक्षेबाबत आढावा घेतला. अजनी पोलिसांकडे हे प्रकरण सोपविले.
घरापासून शेकडो किलोमीटर दूर मेडिकलच्या वसतिगृहात विद्यार्थिनी राहतात. त्यांच्या स्थानिक सुरक्षेची जबाबदारी मेडिकल प्रशासनाची आहे. सद्यस्थितीत शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी १, ३ व ६ क्रमांकाचे वसतिगृह आहे. या तिन्ही वसतिगृहात मिळून जवळजवळ ३५० ते ४०० मुली राहतात तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुमारे २२५ मुलींसाठी न्यू पीजी होस्टेल व मार्डचे होस्टेल आहे. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान वसतिगृह क्रमांक एक समोर एक युवक मुलींना पाहून अश्लील वर्तन करीत होता. या प्रकारामुळे मुली दहशतीत आल्या. काही मुलींनी त्याचे फोटो मोबाईलमधून काढून घेतले. सुरक्षा रक्षकाला याची माहिती मिळताच युवक पळून गेला. याची माहिती अधिष्ठाता डॉ. मित्रा यांना देण्यात आली. त्यांनी लागलीच ‘महाराष्टÑ सुरक्षा बल’ व अजनी पोलिसांची एक संयुक्त बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला. मुलींनी काढलेला फोटो पोलिसांचा स्वाधीन केला. विशेष म्हणजे, मुलींच्या सुरक्षेसाठीच तत्कालीन अध्ठिाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी मेडिकलच्या मागची मोडकळीस आलेली सुरक्षा भिंत बांधली. प्रवेशद्वारही बंद केले. सोबतच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रवेशद्वार काही तासांसाठीच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतरही समाजविघातकांचा त्रास सुरूच आहे.
ट्रॉमा केअर सेंटरमध्ये चोरी
ट्रॉमा केअर सेंटरमध्ये लिफ्टचे बांधकाम सुरू आहे. चोरट्याने लिफ्टचे साहित्य चोरल्याची तक्रार सोमवारी समोर आली. एका पोलिसाने सांगितले, रुग्णालयाच्या परिसरात चोरीचा घटना वाढल्या आहेत. नुकतीच एका इसमाची दुचाकी चोरीला गेल्याचीही तक्रार आहे.
मार्गावर बॅरिकेट्स लावणार
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला घेऊन आढावा घेण्यात आला आहे. मेडिकलमध्ये येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक व बाहेरील लोकांनाही महाविद्यालय व वसतिगृहाकडे जाता येणार नाही यासाठी चार मार्गावर ‘बॅरिकेट्’स लावण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आता मेडिकलचा स्टाफ व विद्यार्थ्यांनाही आपले ओळखपत्र दाखविल्याशिवाय समोर जाता येणार नाही.
-डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल