बार कौन्सिल निवडणुकीत मतपत्रिकांची फोटोग्राफी; नियमांना दाखविली केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 10:02 AM2018-03-29T10:02:36+5:302018-03-29T10:03:27+5:30

निवडणुकीत मतदान करण्यासाठी गेलेल्या वकिलांनी पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढून घेतले आहेत. त्या फोटोवरून वकिलांनी कुणाला कोणत्या पसंतीचे मतदान केले, हे दिसून येत आहे. या गैरप्रकारामुळे कौन्सिलची निवडणूक अडचणीत येणार आहे.

Photography of ballot papers in bar council elections | बार कौन्सिल निवडणुकीत मतपत्रिकांची फोटोग्राफी; नियमांना दाखविली केराची टोपली

बार कौन्सिल निवडणुकीत मतपत्रिकांची फोटोग्राफी; नियमांना दाखविली केराची टोपली

Next
ठळक मुद्देवकिलांनीच काढले फोटोकोणाला मतदान केले हे स्पष्ट दिसते

राकेश घानोडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कायद्याच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये राज्यघटनेतील गुप्त मतदानाच्या तरतुदीला धक्का पोहोचविणारी व लोकशाहीला तडा देणारी अशी घटना घडली आहे. निवडणुकीत मतदान करण्यासाठी गेलेल्या वकिलांनी पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढून घेतले आहेत. त्या फोटोवरून वकिलांनी कुणाला कोणत्या पसंतीचे मतदान केले, हे दिसून येत आहे. या गैरप्रकारामुळे कौन्सिलची निवडणूक अडचणीत येणार आहे.
कौन्सिलच्या २५ जागांसाठी बुधवारी निवडणूक झाली. यावेळची निवडणूक विविध कारणांनी वादग्रस्त ठरल्यामुळे कौन्सिल प्रत्येक गोष्टीविषयी सावधान होते. निवडणुकीचे कामकाज पाहण्यासाठी न्यायालय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यापूर्वी विधिज्ञ संघटनांच्या सदस्यांकडे ही जबाबदारी राहात होती. परंतु, वाद टाळण्यासाठी त्यांना निवडणूक व्यवस्थेपासून लांब ठेवण्यात आले होते. निवडणूक कक्षातील अनधिकृत हालचाली रेकॉर्ड करून संबंधितावर आवश्यक कारवाई करता यावी, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. तसेच, मतदान कक्षामध्ये मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. वकिलांना मतदान कक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्याकडील मोबाईल निवडणूक कर्मचाऱ्यांकडे जमा करायचे होते. परंतु, मतदार वकील व निवडणूक कर्मचाऱ्यांनी या नियमाला केराची टोपली दाखविली.
नागपूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ आणि जिल्हा व सत्र न्यायालयात मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी वकिलांनी मोबाईल सोबत नेऊन मतदान केले. त्यांनी कौन्सिलचे निर्देश पाळले नाहीच, पण निवडणूक कर्मचाऱ्यांनीही त्यांना मोबाईल जमा करण्यास सांगण्याची तसदी घेतली नाही. न्यायदान व्यवस्थेत रोज कार्य करणाऱ्या या दोन्ही घटकांनी नियमाची पायमल्ली केली. काही वकिलांनी त्याही पुढे जाऊन पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढले. त्या फोटोच्या आधारे उमेदवारांसोबत आर्थिक व अन्य विविध प्रकारचे व्यवहार केले जातील, असा संशय विधी वर्तुळात व्यक्त केला जात आहे. या दोन्ही ठिकाणी वकिलांनी मोबाईल सोबत नेऊन मतदान केले. त्यांनी कौन्सिलचे निर्देश पाळले नाहीच, पण निवडणूक कर्मचाऱ्यांनीही त्यांना मोबाईल जमा करण्यास सांगण्याची तसदी घेतली नाही. न्यायदान व्यवस्थेत रोज कार्य करणाऱ्या या दोन्ही घटकांनी नियमाची पायमल्ली केली. काही वकिलांनी त्याही पुढे जाऊन पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढले. त्या फोटोच्या आधारे उमेदवारांसोबत आर्थिक व अन्य विविध प्रकारचे व्यवहार केले जातील, असा संशय विधी वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

छायाचित्रातील मतपत्रिकेत मतदान
छायाचित्रातील मतपत्रिकेमध्ये संबंधित वकिलाने जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष सुदीप जयस्वाल (नागपूर) यांना पहिल्या पसंतीचे, अ‍ॅड. शाहेनशाह शाहनवाज काझी (औरंगाबाद) यांना सोळाव्या पसंतीचे तर, अ‍ॅड. सुनील लाचरवार (नागपूर) यांना बाराव्या पसंतीचे मत दिले असल्याचे दिसून येत आहे. अशाप्रकारे अनेक वकिलांनी पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेची फोटोग्राफी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

चौकशी केली जाईल
वकील मतदारांना मतदान कक्षात मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. असे असताना मतदार वकील मतदान कक्षात मोबाईल घेऊन गेले असतील तर, ही अतिशय गंभीर बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कायद्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. तक्रारींवर निर्णय घेण्यासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले आहे. चौकशीनंतर हे प्रकरण न्यायाधिकरणासमक्ष सादर केले जाईल, अशी प्रतिक्रिया निवडणूक निरीक्षण समितीचे सदस्य अ‍ॅड. श्यामसुंदर दांगट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Photography of ballot papers in bar council elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.