छायाचित्र हे वृत्तपत्राचा आत्मा होय; नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 08:33 PM2022-08-19T20:33:17+5:302022-08-19T20:33:47+5:30
Nagpur News छायाचित्र हा वृत्तपत्राचा आत्मा आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केले.
नागपूर : कोणत्याही बातमीत छायाचित्र हे त्या बातमीला जिवंतपणे वाचकांसमोर मांडण्याचे काम करीत असते. त्यामुळे छायाचित्र हा वृत्तपत्राचा आत्मा आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केले.
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आर. विमला होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त अमितेश कुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री अनिस अहमद, जसबीर सिंग, नगरसेविका प्रगती पाटील, केंद्रीय संचार ब्यूरोचे सहायक संचालक हंसराज राऊत उपस्थित होते.
कार्यक्रमात ज्येष्ठ छायाचित्रकार अजाबराव खारोडे, विनय लोहित यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख ५ हजार रुपये देऊन स्व. उदयराव वैतागे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, कोरोनाच्या काळात बहुतांश कर्मचारी वर्क फ्रॉम होम असताना छायाचित्रकारांनी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावले. छायाचित्रकारांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन फोटो काढावे लागत असल्यामुळे त्यांचे कष्टाचे काम असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी नव्या तंत्रज्ञानासोबत छायाचित्रकारांचे कामही आव्हानात्मक झाल्याचे सांगितले. माजी मंत्री अनिस अहमद यांनी छायाचित्रकार समाजाला न्याय देण्याचे काम करीत असल्याचे मत व्यक्त केले. आमदार विकास ठाकरे यांनी फोटोग्राफर असोसिएशन पार पाडत असलेल्या सामाजिक जबाबदारीवर प्रकाश टाकला. माहिती संचालक हेमराज बागुल यांनी प्रसंगाची दाहकता फोटोतूनच व्यक्त होऊ शकत असल्याची माहिती दिली.
क्षेत्रीय संचार ब्यूरोचे सहायक संचालक हंसराज राऊत यांनी फोटोग्राफर समाजाचे प्रतिबिंब म्हणून कार्य करीत असल्याचा उल्लेख केला. प्रगती पाटील यांनी छायाचित्रांमुळे वृतपत्राचा दर्जा अधिक वाढल्याचे मत व्यक्त केले. राजेश टिकले यांनी प्रास्ताविक केले. अनंत मुळे यांनी संचालन केले. मुकेश कुकडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमात सीताबर्डीचे ठाणेदार सबनीस, वाहतूक निरीक्षक डोळस, बंटी मुल्ला, नागेश सहारे, चेतना टांक, अतुल कोटेचा यांचा नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे संदीप गुरघाटे, अजय वैतागे, संजय लचुरिया, विजय जामगडे, अनिल फुटाणे, सतीश राऊत यांनी सत्कार केला.
..............