Phubbing... मोबाईलच्या विळख्यातून सोडवण्यासाठी तयार केलेला नवा शब्द..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:46 AM2018-05-25T10:46:14+5:302018-05-25T10:46:34+5:30
Phubbing (फबिंग) हा शब्द तुम्ही ऐकला आहे काय..?.. नाही..? मग एक नवा शब्द तुमची वाट पाहतो आहे...
वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: Phubbing (फबिंग) हा शब्द तुम्ही ऐकला आहे काय..?.. नाही..? मग एक नवा शब्द तुमची वाट पाहतो आहे...
२००७ मध्ये जेव्हा स्मार्टफोन या भूतलावर अवतरले तेव्हा ते २१ व्या शतकातला एक नवा प्रश्न म्हणून समोर येतील असे कुणालाही वाटले नव्हते. मोबाईलने जगाला जवळ तर आणले पण माणसाला माणसापासून दूर नेले. रेल्वेस्टेशन असो वा बसस्टँड, कॉलेज कट्टा असो वा रेस्टॉरंट सगळे आपापल्या मोबाईलमध्ये मग्न असतात. एखाद्या जोडीतला जोडीदार मोबाईलमध्ये व्यस्त असतो आणि दुसरा फक्त त्याच्याकडे पाहत राहतो किंवा एखाद्या ग्रूपमध्ये चारपाच जण मोबाईलवेडे असतात आणि एकदोघांना गप्पाच मारायच्या असतात तेव्हा एक तणावपूर्ण स्थिती निर्माण होत असते. हा एक प्रकारचा आजारच पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये दिसू लागला होता. मोबाईलच्या अतिवापरामुळे उपेक्षित, दुर्लक्षित, एकाकीपणाच्या जाणिवा तीव्र होत चालल्या होत्या. अशा स्थितीचे वर्णन कसे करावे? याला नेमका काय शब्द द्यावा.. प्रश्न पडला होता.
आॅस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठात वेगवेगळ््या क्षेत्रातील दिग्गजांची एक मिटींग झाली. तीत Lexicologist (शब्दाच्या निर्मिती व वापराचे तज्ज्ञ), Phonetician (असे तज्ज्ञ जे शब्दांच्या स्वरांचा अभ्यास करतात व त्यांच्या लिप्यकरणास सहाय्य करतात.), वादविवादपटू, कवी, लेखक, शब्दकोडे तयार करणारे पटू सहभागी झाले होते. त्यांच्यासमोरचे आव्हान होते की, असा एक शब्द तयार करायचा की जो उच्चारला की, लोकांना त्यांचा मोबाईल खाली ठेवणे भाग पडेल आणि ते एकमेकांशी पुन्हा बोलू लागतील.
जगभरातल्या विद्वानांनी भरलेल्या त्या सभागृहात मग नवा शब्द शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले. वेगवेगळे शब्द समोर आले.. नबिंग, फफिंग, फ्रोलिंग, इंगिग, एक्सिंग...आणि अखेरीस... फबिंग.
फबिंग शब्दावर सर्वसहमतीने शिक्कामोर्तब झाले. एका नव्या शब्दाचा अविष्कार झाला होता. मानवजातीच्या एकोप्यासाठी तयार झालेला तो शब्द होता. फबिंग हा शब्द इंग्रजी भाषेच्या देशांमध्ये सर्वात आधी लोकप्रिय झाला नंतर उर्वरित जगात विस्तारला. ‘Stop phubbing’, ‘Are you a phubber?’ ‘He is a phubber; would you stop phubbing me.’ अशी वाक्ये बोलली जाऊ लागली. मोबाईलचा अतिवापर करण्यास विरोध केला जाऊ लागला. स्मार्टफोनमधील व्यस्ततेमुळे तुमच्या समोरच्या व्यक्तीला वाटत असलेल्या दुर्लक्षित भावनेला एक शब्द मिळाला आणि तिला त्या स्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गही गवसला.
भाषा नेहमी बदलत असते.. चला, तुम्हीही तुमची डिक्शनरी आता अपटेड करून घ्या..