फुले-आंबेडकर यांची ‘राष्ट्र संकल्पना’ समताधिष्ठित : सुखदेव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:24 PM2019-04-13T22:24:47+5:302019-04-13T22:25:50+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्रीयता म्हणजे काय, यावर आपले विचार मांडले आहे. त्यांच्यानुसार जेव्हा समाजामध्ये समानता, एकत्र असण्याची भावना, समान विचार, समान चेतना, लोकांमध्ये एकमेकांबद्दल सहवेदना असेल, तरच राष्ट्र अधिक समर्थ बनेल. ही बाबासाहेबांची समताधिष्ठीत राष्ट्र संकल्पना होती, असे प्रतिपादन अनुदान आयोग विद्यापीठाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.

Phule-Ambedkar's 'Nation Concept' equated: Sukhdev Thorat | फुले-आंबेडकर यांची ‘राष्ट्र संकल्पना’ समताधिष्ठित : सुखदेव थोरात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती सोहळ्यात विचार मांडताना जैबुप्रिसा शेख, मंचावर सरोज आगलावे, डॉ. सुखदेव थोरात, प्रा. डॉ. सागर जाधव, विलास गजघाटे व प्रा. रमेश पिसे.

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती सोहळ्याला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्रीयता म्हणजे काय, यावर आपले विचार मांडले आहे. त्यांच्यानुसार जेव्हा समाजामध्ये समानता, एकत्र असण्याची भावना, समान विचार, समान चेतना, लोकांमध्ये एकमेकांबद्दल सहवेदना असेल, तरच राष्ट्र अधिक समर्थ बनेल. ही बाबासाहेबांची समताधिष्ठीत राष्ट्र संकल्पना होती, असे प्रतिपादन अनुदान आयोग विद्यापीठाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समिती, नागपूरच्यावतीने दीक्षाभूमी येथे शनिवारपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी फुले-आंबेडकर यांची ‘ राष्ट्र संकल्पना’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, प्रा. डॉ. सागर जाधव, प्रा. रमेश पिसे, जैबुप्रिसा शेख व सरोज आगलावे उपस्थित होत्या.
डॉ. थोरात म्हणाले, एक भूभाग, एक वंश, एक भाषा, एक संस्कृती ही राष्ट्र बनविण्याकरिता आवश्यक आहेच, परंतु सोबतच राष्ट्रीयत्वाची भावना त्याहूनही आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले समताधिष्ठीत राष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न सुरू असलेतरी ते अपुरे पडत आहे. यात प्रत्येकाच्या सहभागाची गरज आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत जातीजातीमधील तेढ वाढली आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर बाधा आली आहे. विशिष्ट धर्माची वैदिक विचारसरणी लादण्याचा प्रयत्न होत आहे. ही समताधिष्ठित राष्ट्राला मारक ठरणारी आहे, असेही ते म्हणाले.
प्रा. डॉ. सागर जाधव म्हणाले, शुद्रातील शुद्र माणसाचा विकास होत नाही तोपर्यंत या देशाला ‘नेशन’ असे म्हणता येणार नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही संकल्पना मांडून थांबले नाहीत तर, त्यांनी आपल्या हयातीमध्ये ग्रंथांच्या माध्यमातून, स्त्रियांच्या, अस्पृश्य उद्धारातून, शिक्षणाच्या चळवळीतून यावर काम केले आहे. राष्ट्रामध्ये सर्व जातीधर्माचे लोक एकत्र कसे राहतील अशी भूमिका महात्मा फुले यांनी मांडली आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानुसार, जोपर्यंत जाती, वेद, पंथ अस्तित्वात राहतील, तोपर्यंत बंधुत्वाची भावना विकसित होणार नाही. यामुळे राष्ट्राचा विकासही होणार नाही, असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रा. रमेश पिसे व जैबुप्रिसा शेख यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक सरोज आगलावे यांनी केले. संचालन डॉ. सरोज डांगे यांनी केले.

Web Title: Phule-Ambedkar's 'Nation Concept' equated: Sukhdev Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.