‘लिव्ह इन’मधील प्रेयसीवर अत्याचार, तिच्या मृतक आईच्या नावावर घेतले कर्ज
By योगेश पांडे | Published: November 6, 2023 06:00 PM2023-11-06T18:00:40+5:302023-11-06T18:01:07+5:30
फसवणूक व अत्याचाराचा गुन्हा दाखल
नागपूर : ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने तिच्या आईच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्याची बाब समोर आली आहे. पोलिसंनी आरोपीला अटक केली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
प्रफुल्ल रामचंद्र बले (३५, पिरॅमिड सिटी, बेलतरोडी) असे आरोपीचे नाव आहे. २४ वर्षीय तरुणीशी त्याची कोरोनादरम्यान ओळख झाली होती. तिच्या आईला कोरोना झाला होता व त्यावेळी प्रफुल्लसोबत तिची ओळखी झाली. कोरोनामुळे तिच्या आईचा मृत्यू झाला. प्रफुल्लने तिला भावनिक आधार दिला व मैत्री केली. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढत गेली व त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला आपण लग्न करू असे आमिष दाखवत ‘लिव्ह इन’मध्ये राहण्यास भाग पाडले. १४ एप्रिल २०२१ पासून फेब्रुवारी २०२३ या कालावधीत त्याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. या कालावधीत त्याने तिच्या आईचे आधार कार्ड व पॅनकार्ड वापरून वेगवेगळ्या लोन ॲपवरून दीड लाखांचे कर्ज घेतले.
काही महिन्यांनी बँकेतून कर्ज भरण्यासाठी नोटीस आली. त्यामुळे तिला आश्चर्य वाटले. मृत पावलेली आई कर्ज कशी घेऊ शकते, असा सवाल तिन बँक अधिकाऱ्यांना विचारला असता सर्व सत्य समोर आले. तिने त्याला कर्जाची रक्कम भरण्यास सांगितले. प्रफुल्लने तिला नकार दिला. तसेच त्याने लग्न करण्यासदेखील मनाई केली. अखेर तरुणीने पाचपावली पोलीस ठाणे गाठले व प्रफुल्लविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणूक व अत्याचाराचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.