जिल्हा न्यायालयात आजपासून फिजिकल सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:07 AM2021-06-01T04:07:16+5:302021-06-01T04:07:16+5:30
नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालय आणि इतर कनिष्ठ न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणांवर उद्यापासून ऑनलाइनसह फिजिकल सुनावणीही घेतली जाणार आहे. ...
नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालय आणि इतर कनिष्ठ न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणांवर उद्यापासून ऑनलाइनसह फिजिकल सुनावणीही घेतली जाणार आहे. वकिलांची मागणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी सोमवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले.
वाढते कोरोना संक्रमण लक्षात घेता जिल्हा व सत्र न्यायालय आणि इतर कनिष्ठ न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणांवर ४ जूनपर्यंत केवळ ऑनलाइन सुनावणी करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. परंतु, ऑनलाइन सुनावणी वकिलांसह प्रशासनासाठीही विविध अडचणीची ठरली. त्यामुळे वकिलांनी सुनावणीसाठी ऑनलाइन व फिजिकल हे दोन्ही पर्याय उपलब्ध करण्याची मागणी रेटून धरली होती. करिता, जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अॅड. कमल सतुजा व महासचिव अॅड. नितीन देशमुख यांनी सोमवारी २० ते २५ वकिलांसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची भेट घेऊन फिजिकल सुनावणी सुरू करण्याची विनंती केली. न्या. शुक्रे यांनी वकिलांची अडचण समजून घेऊन याविषयी न्या. मेहरे यांना आवश्यक निर्देश दिले. परिणामी, संबंधित परिपत्रक जारी करण्यात आले.
--------------------
अशी आहे सुधारणा
नवीन परिपत्रकानुसार, उद्यापासून ज्या वकिलांना ऑनलाइन सुनावणीत सहभागी होणे शक्य नाही, त्यांना न्यायालयात जाऊन प्रत्यक्ष सुनावणीत सहभागी होता येईल. परंतु, पक्षकारांना न्यायालय परिसरात प्रवेश करण्यावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय, ई-मेलद्वारे फायलिंग व ड्रॉप बॉक्सची सुविधा बंद करण्यात आली आहे. आता तातडीची प्रकरणे केवळ ई-फायलिंगद्वारे किंवा सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत प्रत्यक्षरीत्या संबंधित विभागात दाखल करता येणार आहे.