नागपुरी संत्री-मोसंबीला फायटोप्थोराची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:08 AM2021-07-07T04:08:54+5:302021-07-07T04:08:54+5:30
नागपूर : जागतिक पातळीवर ओळख बनलेली नागपुरी संत्री आणि मोसंबी सध्या फायटोप्थोरा या बुरशीजन्य रोगाच्या प्रभावाखाली आहे. विशेषत: काटोल ...
नागपूर : जागतिक पातळीवर ओळख बनलेली नागपुरी संत्री आणि मोसंबी सध्या फायटोप्थोरा या बुरशीजन्य रोगाच्या प्रभावाखाली आहे. विशेषत: काटोल आणि नरखेड तालुक्यात याचा अधिक प्रादुर्भाव दिसत आहे. येथील उत्पादकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. सध्याचे दमट हवामान आणि पाण्याचा निचरा न होणे यामुळे हे संक्रमण दिसत आहे. साधारणत: पावसाळ्याच्या उत्तरार्धात ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात होणारे हे संक्रमण यंदा जुलैतच दिसत आहे. यामध्ये होत असलेल्या फळगळीनेदेखील शेतकऱ्यांमध्ये असलेला गोंधळ वाढला आहे.
या संक्रमणामध्ये परिपक्व किंवा परिपक्व होण्याच्या स्थितीतील फळांवर घट्ट चामड्यासारखे चट्टे दिसतात. ते लवकर मऊ होऊन नंतर पिवळट तपकिरी रंगाचे दिसतात. फळाला तीव्र गंध येतो, बुरशीची वाढ होऊन फळ गळते. फांद्या, पाने आणि मोहोर तपकिरी रंगाचा होतो. यातील गंभीर धोका असा की, फळतोडणीच्या वेळी आणि आधी लक्षणे दिसत नाही. मात्र तोडणीनंतर फळ मिसळल्यास सर्व फळे संक्रमित होण्याचा धोका यात असतो. फायटोप्थोरा पाल्मिवोरा आणि फायटोप्थोरा निकोशियानी या दोन प्रजातींचे हे रोग असतात. यापैकी पाल्मिवोरा अधिक आक्रमक असून त्याचा प्रसार हवेतून होतो. झाडावरील फळे संक्रमित होऊन गळतात.
...
असा करावा उपाय
या संक्रमणापासून वाचण्यासाठी जमिनीपासून २४ किंवा त्यापेक्षा अधिक इंच उंचीपासून छाटणी करावी. पहिल्या पावसाआधी कॉपरयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करावी. १ टक्का बोर्डेक्स मिश्रण, कॉपर ॲक्सिक्लोराईड, ३ ग्रॅम लिटरमध्ये फवारणी करावी. पाऊस जास्त पडल्यास पुन्हा फवारणी करावी.
...
शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी. गंभीर धोका असल्यास संक्रमित बागांमध्ये फॉसेटिल ॲल्युमिनियम किंवा मेफोनोक्झान एमझेड अडीच लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संक्रमित फळे क्रेट बॉक्समध्ये टाकू नये.
- डॉ. डी.के. घोष,
संचालक, आय.सी.ए.आर. - केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था
...