नागपुरात एसएनडीएलच्या पथकावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:15 AM2018-03-15T01:15:27+5:302018-03-15T01:15:46+5:30
वीज वितरण फ्रेन्चायसी एसएनडीएलतर्फे वीजचोरी रोखण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. मात्र, बुधवारी ताजाबाद मेला मैदानाच्या मागील आझाद कॉलनीमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पथकावर दगडफेक करण्यात आली. यामुळे तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. पाच लोकांना ताब्यातही घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज वितरण फ्रेन्चायसी एसएनडीएलतर्फे वीजचोरी रोखण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. मात्र, बुधवारी ताजाबाद मेला मैदानाच्या मागील आझाद कॉलनीमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पथकावर दगडफेक करण्यात आली. यामुळे तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. पाच लोकांना ताब्यातही घेतले.
एसएनडीएलचे पथक बुधवारी दुपारी आझाद कॉलनीत पोहचले व मीटरची तपासणी सुरू केली. पथकात २५ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यावेळी येथील नागरिकांनी पथकाला थांबविले व त्यांच्याकडे कारवाईची परवानगी आहे का, अशी विचारणा केली. पथकाने नागरिकांना कागदपत्र दाखविले व कारवाई सुरू ठेवली. दुपारी २ च्या सुमारासा काही लोक एकत्र आले व त्यांनी कारवाई थांबविण्यासाठी एकच गोंधळ घातला. एसएनडीएलचे कर्मचारी मीटर तपासण्याच्या नावावर त्यांच्या घरात शिरत आहेत, असा नागरिकांचा आरोप होता. दरम्यान, एका घरातील महिलेने आरडाओरड सुरू केली. हे पाहून वातावरण आणखी भडकले व काही लोकांनी एकाएक पथकावर दगडफेक सुरू केली. हे पाहून कर्मचाºयांनी धावपळ करीत मिळेल तेथे आडोसा शोधला. पोलिसांना कळविण्यात आले. काही वेळातच पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी हलका बलप्रयोग करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. पाच लोकांना ताब्यातही घेतले.
व्यवस्थापक जखमी
- एसएनडीएलचे व्यापार प्रमुख सोनल खुराना यांनी दिलेल्या माहितीनुसार दगडफेकीमध्ये कंपनीचे व्यवस्थापक भवानी प्रसाद चौबे यांच्या डोक्याला दगड लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. वीजचोरीच्या विरोधात मोहीम सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२८ ठिकाणी चोरी पकडली
- दगडफेकीनंतरही एसएनडीएलच्या पथकाने परिसरात कारवाई सुरू ठेवली. या दरम्यानस २८ ठिकाणी वीज चोरी पकडण्यात आली. एका ट्यूशन क्लासमध्ये सुमारे ११ केव्ही वीज चोरीचा पर्दाफाश झाला. कंपनी आता वीज चोरीचा हिशेब करीत आहे.