नागपुरात चित्रनगरी व्हायलाच हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:19 AM2017-09-03T01:19:11+5:302017-09-03T01:19:28+5:30
शहर व विदर्भात अनेक चांगले नाट्यकलावंत आहेत. या कलावंतांच्या प्रतिभेला पंख द्यायचे असतील तर नागपुरात चित्रनगरी व्हायलाच हवी, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर व विदर्भात अनेक चांगले नाट्यकलावंत आहेत. या कलावंतांच्या प्रतिभेला पंख द्यायचे असतील तर नागपुरात चित्रनगरी व्हायलाच हवी, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केली. डॉ.एम.के.उमाठे कॉलेजच्यावतीने सायंटिफिक सभागृहात शुक्रवारी आयोजित मालती करंडक एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर समाजसेविका सिंधूताई सपकाळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, स्पर्धेचे परीक्षक किशोर आयलवार, डॉ. प्रवीण पारधी आणि अॅड.पराग लुले यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर उमाठे उपस्थित होेते. सिंधूताई सपकाळ यांनी विद्यार्थ्यांच्या हृदयाला स्पर्श करणारे भाषण केले. त्या म्हणाल्या, मी जग फिरले पण कोणत्याही देशात आपल्या देशाला माता म्हटले जात नाही. भारत एक असा देश आहे ज्याने आपल्या मातृभूमीला मातेचा दर्जा दिला आहे. प्रास्ताविक प्राचार्य डी. व्ही. नाईक यांनी केले. संचालन डॉ. मंजिरी पाठक तर आभार प्रा. मीरा मोरोणे यांनी मानले.
‘नथिंग टू से’ द्वितीय,
या स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या ह्यमुक्तिदाताह्ण या एकांकिकेने ‘मालती करंडक’ पटकावला. डॉ़ एम. के़ उमाठे कॉलेजद्वारे सादर झालेल्या ‘नथिंग टू से’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट द्वितीय एकांकिकेचा पुरस्कार मिळाला.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत आठ एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले़ या स्पर्धेत उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मोहता सायन्सतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘दुरुपयोग’ या एकांकिकेचा लेखक आकाश पौनीकर तर उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार जे़ डी़ कॉजेजच्या ‘खाप’ या एकांकिकेसाठी वैभव कामडी यास मिळाला. उत्कृष्ट प्रकाशयोजना-सी़ पी़ अॅण्ड बेरारतर्फे सादरीत ‘स्टॉप’ या एकांकिकेसाठी वृषभ धापोडकरला तर उत्कृष्ट नेपथ्याचा पुरस्कार ‘खाप’ एकांकिकेसाठी पीयूष मेहर व अनमोल चचाने यांना प्रदान करण्यात आला़ ‘मुक्तिदाता’ एकांकिकेचे दिग्दर्शक किशोर पगारे यास उत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. उत्कृष्ट अभिनय प्रथम ओमप्रकाश लांजेवार व मधुरा सामक यांना आणि द्वितीय पुरस्कार वैभव चौधरी व श्रेया जोशी यांना प्रदान करण्यात आला़