‘सुपर एल-निनाे’ प्रभावाचे चित्र स्पष्ट नाही, हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांचे मत

By निशांत वानखेडे | Published: October 18, 2023 08:05 PM2023-10-18T20:05:43+5:302023-10-18T20:05:54+5:30

चक्रीवादळे राज्यात पावसासाठी अनुकूल नाहीत

picture of 'Super L-Nina' effect is not clear, meteorologist Manikrao Khule says | ‘सुपर एल-निनाे’ प्रभावाचे चित्र स्पष्ट नाही, हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांचे मत

‘सुपर एल-निनाे’ प्रभावाचे चित्र स्पष्ट नाही, हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांचे मत

नागपूर : सध्या सक्रिय असलेला ‘एल-निनाे’ अधिक तीव्र हाेत त्याचे ‘सुपर एल-निनाे’ मध्ये रुपांतर हाेईल आणि भारताच्या मान्सूनवर नकारात्मक परिणाम हाेईल, अशी शक्यता अमेरिकन संस्था ‘नाेआ’ने वर्तविली आहे. मात्र सध्यातरी सुपर एल-निनाेच्या प्रभावाबाबतचे चित्र स्पष्ट नाही, अशी माहिती हवामान विभागाचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.

नाेआच्या अंदाजानुसार सुपर एल-निनाेच्या प्रभावाने हिवाळ्यातही उष्णता जाणवणार असून उन्हाळा अत्याधिक तापदायक राहण्याची शक्यता आहे. शिवाय त्याचा मान्सूनवरही परिणाम हाेण्याची शक्यता संस्थेने व्यक्त केली आहे. त्यामुळे भारतात दुष्काळाची स्थिती येण्याची भीती त्यात आहे. मात्र माणिकराव खुळे यांच्या मते ती स्थिती अद्यापतरी स्पष्ट नाही. नाेआने याचवर्षी फेब्रुवारीमध्ये एल-निनाे जूनपासून कार्यरत हाेण्याची व पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तविली हाेती. जुलैमध्ये जाेरदार पाऊस झाला. ऑगस्टच्या काेरड्या स्थितीमुळे एल-निनाेचा प्रभाव वाढल्याचे जाणवले पण सप्टेंबरमध्ये अखेर पावसाची सरासरी भरून निघाली. त्यामुळे सुपर एल-निनाेच्या प्रभावासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागेल, असे स्पष्ट मत खुळे यांनी व्यक्त केले.

पावसासाठी अनुकूल नाही स्थिती
दरम्यान सध्या अरबी समुद्रात केरळ राज्यातील लक्षद्विप बेटाच्या पश्चिमेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून एका आठवड्यात २६ ऑक्टाेबरनंतर पुढच्या टप्प्यात विकसित हाेवून ओमानच्या दिशेने निघून जाईल. श्रीलंकेच्या कोलोम्बो शहराच्या अक्षवृत्तावर पश्चिमेकडे दक्षिण ब्रम्हदेशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीचे रूपांतर २१ ऑक्टोबरला कमी दाब क्षेत्रात हाेईल व नंतर पुढील टप्प्यात दक्षिण बांगलादेशाकडे दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे. मात्र काेणतीही स्थिती महाराष्ट्रावर पावसासाठी अनुकूल नसल्याचा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे.

आठवडाभर ऑक्टाेबर हिट
सध्या विदर्भासह महाराष्ट्राला ऑक्टाेबर हिटचे चटके सहन करावे लागत आहे. तज्ज्ञांच्या मते आठवडाभर म्हणजे २५ ऑक्टाेबरपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर बदलत्या वातावरणाची स्थिती स्पष्ट हाेईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: picture of 'Super L-Nina' effect is not clear, meteorologist Manikrao Khule says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.