बिबट्या महाराज बागेजवळ, भिंतीलगत डुकराची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:07 AM2021-06-02T04:07:18+5:302021-06-02T04:07:18+5:30

नागपूर : शुक्रवारी आयटी परिसरात दिसलेला बिबट्या आता थेट महाराज बागेजवळ पोहोचला आहे. मंगळवारी सकाळी त्याने अर्धवट खाल्लेली डुकराची ...

Pig hunting near the leopard Maharaj garden, under the wall | बिबट्या महाराज बागेजवळ, भिंतीलगत डुकराची शिकार

बिबट्या महाराज बागेजवळ, भिंतीलगत डुकराची शिकार

googlenewsNext

नागपूर : शुक्रवारी आयटी परिसरात दिसलेला बिबट्या आता थेट महाराज बागेजवळ पोहोचला आहे. मंगळवारी सकाळी त्याने अर्धवट खाल्लेली डुकराची शिकार नाल्यात आढळली. यामुळे तो पुन्हा रात्री या परिसरात येणार हे गृहीत धरून वनविभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. जागोजागी पिंजरे आणि कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत.

सोमवारी दुपारी महाराज बागेत काम करणाऱ्या आशा निखार नामक महिला कामगाराला तो मोगली गार्डनच्या भिंतीवर बसलेला दिसला होता. त्यानंतर त्याचा या परिसरात बराच शोध घेऊनही तो सापडला नाही. मात्र त्याने रात्री याच गार्डनच्या भिंतीलगत नाल्यात डुकराची शिकार केली. त्यावर यथेच्छ ताव मारला. शिकारीचा बराच भाग त्याने खाल्ला. यावरून तो भुकेलेला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. मंगळवारी वनविभागाच्या पथकाने शोधमोहीम राबविली असता हा प्रकार आढळला. बिबट्या याच परिसरात असल्याची शक्यता गृहीत धरून दुपारनंतर मोठ्या परिसरात वनविभागाची हालचाल वाढली. शिकार झालेल्या परिसरात दोन पिंजरे सायंकाळी लावण्यात आले असून त्यात बकरी सोडण्यात आली आहे.

...

सर्व मार्गावर पिंजरे अन्‌ कॅमेरे

नाल्यामध्ये शिकार केलेल्या ठिकाणी बिबट्याचे पगमार्क आढळले. त्यामुळे त्याच्या मार्गावर पिंजरे लावण्यात आले आहेत. एवढेच नाही तर कॅमेरा ट्रॅपही लावण्यात आले आहेत. बिबट्या यात नक्की आढळेल, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.

...

‘स्टेफी’ही तैनात

वनविभागाच्या सेवेत असलेली सात वर्षांची श्वान ‘स्टेफी’ हीसुद्धा तैनात आहे. सकाळपासूनच तिने आपले काम सुरू केले. शिकारीच्या ठिकाणापर्यंत ती पोहोचली. मात्र परिसरात माणसांची वर्दळ झाल्याने पुढचा माग काढू शकली नाही. दुपारनंतर महाराज बागेतही तिच्याकडून तपासणी करण्यात आली. आयटी पार्क परिसरात वनविभागाने तात्पुरता कँप उभारला आहे. हिंगणा, सेमिनरी हिल्स आणि रेस्क्यू पथकातील जवळपास ३० कर्मचारी वाहनांसह तैनात आहेत.

...

शिकार ठेवली पिंजऱ्यात

बिबट्याने शिकार केलेले डुक्कर सायंकाळी पिंजऱ्यात ठेवण्यात आले. शिकार केल्यावर व ती खाल्ल्यावर वाघ, बिबट्या हे प्राणी पुन्हा शिकार केलेल्या ठिकाणी परत येऊन ती सुरक्षित आहे की नाही हे बघतात. भूक लागल्यावर पुन्हा खातात. हा निसर्गनियम लक्षात घेऊन त्याला पकडण्यासाठी ही योजना केली आहे. पिंजऱ्यात बकरीही बांधण्यात आली आहे.

...

परिसरातील नागरिकांना दक्षतेच्या सूचना

हा परिसर महाराज बाग आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा असून निर्मनुष्य आहे. बाजूला पिकेव्ही कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. तसेच पलीकडच्या बाजूला आणि मेट्रो लाइनच्या पलीकडे असलेल्या नाल्याच्या पलीकडच्या काठावर बंगले व फ्लॅट्‌स आहेत. तेथील नागिरकांना आणि मधील चौकीदारांना वनविभाग आणि सीताबर्डी पोलिसांनी दक्षतेच्या सूचना दिल्या आहे. बिबट्या दिसल्यास कळविण्यासाठी संपर्क क्रमांकही दिले आहेत.

...

कोट

परिसरातील नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. संपर्क क्रमांकही दिले आहेत. गर्दी वाढू नये यासाठी अनाऊसमेंट टाळली. पिंजऱ्यात किंवा कॅमेऱ्यात तो या वेळी ट्रॅप होईल, असा विश्वास आहे.

- भरतसिंग हाडा, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग

...

(फोटो..)

Web Title: Pig hunting near the leopard Maharaj garden, under the wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.