कबूतर जा जा जा.. ; भाेवरी या प्रजातीवर पहिलेच जागतिक संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 10:27 AM2021-07-07T10:27:30+5:302021-07-07T10:29:23+5:30
Nagpur News आता वेळ उडण्याची हाेती. अन्न काेणते व धाेका काेणता, याची शिकवण देऊन एका सकाळी आईने त्या पिल्लांना घरट्याबाहेर ढकलले आणि एका क्षणात ती दाेन्ही चिमुकली भुर्रकन आकाशात उडाली.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्या महिन्यात नर आणि मादी भाेवरीचे मीलन झाले हाेते. मुलांच्या आशेने त्यांनी एका झाडावर काडीकचऱ्याचे घरटे तयार केले. त्या मादीने दाेन अंडी घातली. काही दिवसांनंतर त्यातून पिल्ले बाहेर पडली. भाेवरीच्या त्या जाेडप्याने अंडी असताना ते पिल्ले झाल्यानंतर अगदी माणसांप्रमाणे संगाेपन केले. आता वेळ उडण्याची हाेती. अन्न काेणते व धाेका काेणता, याची शिकवण देऊन एका सकाळी आईने त्या पिल्लांना घरट्याबाहेर ढकलले आणि एका क्षणात ती दाेन्ही चिमुकली भुर्रकन आकाशात उडाली. त्यानंतर त्या नर व मादी भाेवरीनेही ते घरटे साेडले ते कायमचे.
सध्या अमरावती विद्यापीठात प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक डाॅ. के. जी. पाटील आणि इन्स्टिट्यूट ऑफ फाॅरेन्सिक सायन्स, नागपूरचे प्रा. वीरेंद्र शेंडे यांनी भाेवरी या पक्ष्यांवर केलेल्या अभ्यासाची ही कहाणी. कबुतर हे प्रेमाचे प्रतीक आणि प्राचीन काळापासूनचे संदेशवाहक म्हणून ओळखले जाते. संपूर्ण भारतात सर्वत्र आढळणारा व माणसांमध्ये सहज मिसळणारा पक्षी म्हणूनही त्याची ओळख आहे. भाेवरी हा त्या कबुतराच्याच प्रजातीचा एक जीव, जाे मध्य भारतात सर्वत्र आढळताे. मात्र, या काॅमन पक्ष्यावर देशात संशाेधन न झाल्याची कमतरता नागपूरच्या या प्राध्यापकांनी पूर्ण केली.
डाॅ. पाटील आणि प्रा. शेंडे यांनी फेब्रुवारी ते मार्च २०१३ मध्ये भाेवरीच्या जीवनचक्रावर अभ्यास केला. त्यानंतर ऑगस्ट २०१५ मध्ये जागतिक प्राणिशास्त्र पत्रिकेत त्यांच्या संशाेधनाची कबुतराचे भारतातील पहिले संशाधन पेपर म्हणून नाेंद झाली.
निरीक्षणातील महत्त्वाचे बिंदू
- २ ते ७ फेब्रुवारीदरम्यान नर हा मादी भाेवरीसाठी अन्न आणताना दिसला. ही त्यांच्या मीलनाची प्रक्रिया हाेती.
- ८ ते १५ फेब्रुवारीपर्यंत गर्भवती असल्याप्रमाणे उष्ण, मऊ व थाेडे ओलसर असलेल्या राेपट्याच्या कुंडीवर राहत हाेती.
- २२ व २३ फेब्रुवारीला काड्या, गवत व प्लास्टिक वायरच्या मदतीने घरटे तयार केले.
- २३ च्या रात्री एक व २४ फेब्रुवारीला दुसरे अंडे दिले.
- यानंतर मादी दिवसातून १० ते १५ मिनिटे वगळता अंड्यांच्या दूर झाली नाही. नर हाच तिच्यासाठी खाद्य आणत हाेता.
- २ मार्चला एक व ३ मार्चला दुसऱ्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडले.
- त्यानंतर आठ-दहा दिवस नर व मादी दाेघांनीही माणसांप्रमाणे या पिल्लांचे संगाेपन केले. अन्न शाेधण्याचे काम नरानेच केले.
- १५-१६ मार्चला आईने आवश्यक ती शिकवण देऊन दाेन्ही पिल्लांना घरट्याबाहेर ढकलले आणि ती चिमुकली उडून गेली.
- दुसऱ्या दिवशी या जाेडप्यानेही ते घरटे साेडले. काही कालावधीनंतर एका काळ्या बुलबुलने त्या घरट्यात जागा घेतली.
हे अभ्यास निरीक्षण हाेते, पण यातून बऱ्याच गाेष्टी लक्षात आल्या. एकतर प्राणी, पक्ष्यांमध्ये माणसांप्रमाणेच मुलांच्या संगाेपनाच्या भावना असतात व त्याप्रमाणे त्यांचे चक्रही चालते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरले. आंतरराष्ट्रीय प्राणिशास्त्र संस्थेने त्याची प्रशंसा केली, ही आमच्या संशाेधनाची पावती हाेती.
- डाॅ. के. जी. पाटील, प्राध्यापक, प्राणिशास्त्र, अमरावती विद्यापीठ