पाईल्स, फिशरने केली अनेकांची शिकार; अति'काढा'ही ठरला कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 10:22 AM2020-10-28T10:22:32+5:302020-10-28T10:24:32+5:30
Health Nagpur News पाईल्स व फिशर आजाराच्या रुग्णात १५ टक्के वाढ झाली आहे. उठसूठ सर्वांनीच सुचविलेल्या काढ्याचे अतिसेवन व व्यायामाचा अभाव, हे कारणीभूत ठरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रभाव आता कमी होऊ लागला आहे. परिणामी, बहुसंख्य लोक घराबाहेर पडत आहेत. विशेषत: आतापर्यंत अंगावर आजार काढलेले रुग्ण डॉक्टरांकडे गर्दी करीत आहेत. यात पाईल्स व फिशर आजार असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. गुदारोग तज्ज्ञ डॉ. नीलेश जुननकर यांच्यानुसार, या आजाराचे १५ टक्के रुग्णात वाढ झाली आहे. याला बैठी जीवनशैली, तिखट व मसालेदार खाद्यपदार्थांचे सेवन, कोरोनाच्या बचावासाठी उठसूठ सर्वांनीच सुचविलेल्या काढ्याचे अतिसेवन व व्यायामाचा अभाव, हे कारणीभूत ठरले आहे.
बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे पाईल्स म्हणजेच मूळव्याधीची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. शौचाच्या वेळी वेदना होणे, रक्तस्राव होणे, गुदद्वाराचा भाग फुगीर होणे, गाठी निर्माण होणे, ही मूळव्याधीची सर्वसामान्य लक्षणे आहेत. कोरोनाच्या काळातील सुरुवातीचे चार महिने लॉकडाऊन व नंतर पूर्णत: अनलॉक होण्यास आणखी तीन महिन्याचा लागलेल्या कालावधीमुळे बहुसंख्य लोक घरीच होते. त्यांचा जास्तीत जास्त वेळ टीव्ही, लॅपटॉप, संगणक व मोबाईल पाहण्यात गेला. मूळव्याध हा आजार विशेषकरून बैठेकाम करणाऱ्यांना जास्त होतो. यातच बाहेरून मागविण्यात आलेले तिखट व मसालेदार व विविध काढ्याच्या अतिसेवनाने या आजाराने अनेकांना विळख्यात घेतले. विशेष म्हणजे, कोरोनाची लागण होईल या भीतीने सुरुवातीला बहुसंख्य रुग्णांनी डॉक्टरांकडे जाणे टाळले. काहींनी स्वत:हून औषधी घेतली. परिणामी, आजार वाढल्याची अनेक उदाहरणे असल्याचे डॉ. जुननकर यांनी सांगितले. ते म्हणाले, आॅक्टोबर महिन्याच्या मागील २० दिवसात अनेक रुग्णांनी लेजरद्वारे उपचार करून घेतले आहेत.
१८ ते ३५ वयोगटातील सर्वाधिक रुग्ण
डॉ. जुननकर म्हणाले, एक काळ असा होता की मूळव्याध हा विशिष्ट वयानंतर म्हणजे साधारण चाळिशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता परिस्थिती बदलली आहे. १८ ते ३५ या वयोगटातील स्त्री-पुरुषांनाही मूळव्याध आजार होऊ लागला आहे. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे. भारतात आजघडीस सुमारे चार कोटी लोकांना हा आजार आहे. दरवर्षी या आजारात जवळपास १० लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. बदललेले राहणीमान आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे युवावगार्तील मूळव्याधीची मुख्य कारणे आहेत.
तंतूमय पदार्थ आहारामध्ये आवश्यक
रोजच्या आहारामध्ये फळे, भाजीपाला, कडधान्ये यासारखे तंतूमय पदार्थ आवश्यक असतात. मात्र, आजच्या प्रोसेस्ड फूडच्या काळात आहारातून तंतूमय पदार्थ गायब झाले आहेत आणि त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होत आहे. परिणामी, आपण जे खातो ते सहज पचून जाते व शरीरात तयार होणारी विष्ठा कमी प्रमाणात होते. त्यामुळे शौचाला जाण्याचे प्रमाणही कमी होते. हेच कारण मूळव्याधीला कारणीभूत ठरत आहे. याशिवाय, अनैसर्गिक सेक्सही हेही एक कारण आहे.