अंबाझरी मार्गावर पिलरच्या सळाखी कोसळल्या, जीवहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:12 PM2018-05-31T22:12:39+5:302018-05-31T23:03:12+5:30
गुरुवारी पुन्हा एकदा मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान निर्माणाधीन पिलरच्या वजनी सळाखीचा ढाचा अचानक रस्त्यालगतच्या बॅरिकेट्सवर कोसळला. त्या वेळी मार्गावरून जाणारी वाहने जागीच थांबल्यामुळे जीवहानी टळली. यामुळे मेट्रो रेल्वेतर्फे करण्यात येणारा सुरक्षेचा दावा फोल ठरला आहे. ही घटना एलएडी कॉलेज चौक ते अंबाझरी मार्गावर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी पुन्हा एकदा मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान निर्माणाधीन पिलरच्या वजनी सळाखीचा ढाचा अचानक रस्त्यालगतच्या बॅरिकेट्सवर कोसळला. त्या वेळी मार्गावरून जाणारी वाहने जागीच थांबल्यामुळे जीवहानी टळली. यामुळे मेट्रो रेल्वेतर्फे करण्यात येणारा सुरक्षेचा दावा फोल ठरला आहे. ही घटना एलएडी कॉलेज चौक ते अंबाझरी मार्गावर घडली.
प्राप्त माहितीनुसार, दुपारी १२ च्या सुमारात पिलरला लोखंडी कठडे (शटरिंग) बांधण्याचे काम सुरू होते. त्या वेळी एका कामगाराने दोर ओढल्यामुळे एका बाजूचा लोखंडी पाट्यांचा सपोर्ट सुटला. त्यामुळे पिलरसाठी बांधलेला लोखंडी ढाचा कोसळला. सुरक्षेसाठी बांधण्यात आलेल्या कठड्यावर कोसळल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना थांबविण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अनेक तास बंद होती. या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, ट्राफिक मार्शल, वॉर्डन व क्यूआरटी चमूच्या सहायाने या मार्गावरील वाहतूक वळविली. क्रेनच्या साहाय्याने या सळाखींना नंतर कापून दुपारी २ वाजता रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
दरम्यान झालेल्या घटनेची गंभीर दखल घेत महामेट्रो प्रशासनाने कारवाई केली असून तेथील कंत्राटदार राजेश्वर शर्मा आणि अभियंता देशराज या दोघांनाही कार्यमुक्त केले आहे. याशिवाय एफकॉन्स कंपनीवर एक लाखाचा दंड ठोठावला आहे.
कामादरम्यान निरंतर होताहेत अपघात
मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ज्या वेगाने होत आहेत, त्याच प्रमाणात अपघातही वाढले आहेत. शनिवारी वर्धा रोडवर जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनच्या बांधकामादरम्यान महाकाय ८० फूट उंच टॉवर क्रेन अचानक रस्त्यावर कोसळली होती. त्या वेळी पाऊस असल्यामुळे रस्त्यावरून लोकांची ये-जा बंद होती. त्यामुळे जीवहानी टळली. या प्रकारे मुंजे चौकातही मेट्रो स्टेशनच्या बांधकामदरम्यान एका पिलरचा वजनी लोखंडी ढाचा रस्त्यावर कोसळला होता. त्या वेळीसुद्धा जीवहानी झाली नाही. तसेच सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर बांधकामदरम्यान एक वजनी मशीन बॅरिकेट्सवर पडली होती. यामुळे एक वाहनचालक दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झाले होते.