नागपूरच्या टेकडी गणेश मंदिराला मिळणार गुलाबी ‘लूक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:32 AM2018-04-03T10:32:02+5:302018-04-03T10:32:10+5:30
टेकडी येथील गणेश मंदिराला पूर्णत: नवीन ‘लूक’ मिळत असून, याचे भव्य स्वरूप साकारण्यात येत आहे. मंदिराचे निर्माण गुलाबी रंगाच्या पाषाणांपासून करण्याचा मंदिर प्रशासनाचा मानस आहे.
धीरज शुक्ला।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टेकडी येथील गणेश मंदिराला पूर्णत: नवीन ‘लूक’ मिळत असून, याचे भव्य स्वरूप साकारण्यात येत आहे. मंदिराचे निर्माण गुलाबी रंगाच्या पाषाणांपासून करण्याचा मंदिर प्रशासनाचा मानस आहे. यासाठी आवश्यक असलेल्या बन्सी पहाडपूर पाषाणांसंदर्भात निविदा मागविण्यात आल्या आहेत. २० पैकी ६ निविदांसमवेत पाषाणांचे नमुनेदेखील मागविण्यात आले आहेत. मंदिराचे नवीन रूप गुलाबी रंगात रंगलेले दिसून येणार आहे; सोबतच गणपती बाप्पांसाठी ५१ किलोंचे सोन्याचे सिंहासनदेखील तयार करण्यात येणार आहे.
यासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मंदिरासाठी जवळपास सहा हजार चौरस फूट पाषाणांची आवश्यकता भासणार आहे. यापैकी ८० टक्के काम गुलाबी तर २० टक्के काम लाल पाषाणांपासून होणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आता नेमका कोणता पाषाण मजबूत आहे आणि किमतीच्या तुलनेत गुणवत्ता उच्चप्रतीची आहे, यासंदर्भात पदाधिकारी व सदस्यांचे मंथन सुरू आहे. नागपुरातील दोन ‘फर्म’समवेत अहमदाबाद, जयपूर, कच्छ आणि बयाना (भरतपूर) येथील प्रत्येकी एका निविदाकर्त्याने पाषाणांची गुणवत्ता व त्यावरील नक्षीकामाचे नमुने पाठविले आहेत.
जवळपास आठवडाभरात कुणाला कंत्राट द्यायचे, ते निश्चित होईल व याच महिन्यात ‘वर्कआॅर्डर’ जारी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘ट्रस्ट’ने निविदा भरणाऱ्यांसमोर पाषाण कापणे, त्यांना मंदिरापर्यंत आणणे, बाहेरील भिंतीवर लावणे इत्यादी अटीदेखील ठेवल्या आहेत. सद्यस्थितीत मंदिर निर्माणाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या मे-जूनपर्यंत १०० टक्के काम पूर्ण होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सोन्याचे सिंहासन, चांदीचा कलश
‘लोकमत’ने सर्वात अगोदर माहिती दिली होती की, गणपती बाप्पाला सोन्याच्या सिंहासनावर विराजमान करण्यात येईल. ५१ किलो सोन्यापासून याला तयार करण्यात आले आहे. याला नुकताच प्रशासनातर्फे दुजोरा देण्यात आला आहे. ३० मार्च रोजी सोन्याचे सिंहासन बनविण्याच्या प्रस्तावाला ‘ट्रस्ट’च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. यासाठीदेखील लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. मंदिराच्या घुमटाचे कामदेखील जवळपास पूर्ण झाले आहे. यावर ५ ते १० किलो चांदीचा कलश लावण्यात येईल, असे ‘ट्रस्ट’ने ठरविले आहे. यावर सोन्याचा मुलामा देण्यात येईल.
‘साऊंडप्रूफ’ ध्यान केंद्र राहणार
मंदिरात गणेशमूर्तीच्या समोर वरच्या बाजूला ध्यान केंद्र बनविण्याचीदेखील तयारी सुरू आहे. हे केंद्र काचेने पूर्णत: बंद असेल. येथे बसून भक्त कुठल्याही आवाज-गोंधळाशिवाय ध्यान करू शकतील.‘बाल्कनी’वर जाण्यासाठी एकच जिना बनविण्यात आला. परंतु उत्सवांच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता, आणखी एक जिना बनविण्यात येणार आहे. चार मुख्य दरवाजांशिवाय चार लहान द्वारदेखील राहतील.
आतील भिंतींवर संगमरवराचा वापर
मंदिराच्या भव्यतेसाठी ‘ट्रस्ट’ने कंबर कसली आहे. मंदिराची अंतर्गत सुंदरता व मजबूत यासाठीदेखील विविधांगी विचार करण्यात येत आहे. मंदिराच्या आतील भिंतींवर संगमरवराचा वापर होऊ शकतो तर फरशी ‘ग्रेनाईट’पासून तयार करण्यात येईल; सोबतच मुख्य मंदिरातील उपमंदिरांनादेखील त्या जागेवर बनविण्यात येईल. भक्तांना अडचण होऊ नये यासाठी आतून ‘पिलर’ देण्यात आलेले नाही. यासाठी चारही बाजूंनी ‘बाल्कनी’ बनविण्यात येत असून, याला ‘हँगिंग पिलर’चा आधार देण्यात येईल.
भव्यतेसोबतच गुणवत्तेवरदेखील भर
मंदिराला भव्य रूप देण्यासोबतच गुणवत्तेवरदेखील भर देण्यात येत आहे. आम्हाला सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. या महिन्यातच ‘वर्कआॅर्डर’ काढण्यात येईल. ५१ किलोच्या सिंहासनाच्या प्रस्तावालादेखील हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे, अशी माहिती श्री गणेश मंदिर टेकडी ट्रस्टचे सचिव श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.