नळयाेजनेची पाइपलाइन फाेडणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:10 AM2021-03-26T04:10:47+5:302021-03-26T04:10:47+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : मनसर-तुमसर या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. या कामात कंत्राटदार कंपनीद्वारे शीतलवाडी-परसाेडा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : मनसर-तुमसर या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. या कामात कंत्राटदार कंपनीद्वारे शीतलवाडी-परसाेडा येथील नळयाेजनेची पाइपलाइन वारंवार फाेडण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या मार्गाचे कंत्राट बारब्रिक नामक कंपनीला दिले आहे. कंपनीने रामटेक शहराजवळ या मार्गावरील पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. त्यासाठी जेसीबीच्या मदतीने खाेदकाम केले जात आहे. शीतलवाडी-परसाेडा या गावांना खिंडसी (ता. रामटेक) जलाशयातून पाणीपुरवठा केला जात असून, त्यासाठी टाकण्यात आलेली पाइपलाइन याच मार्गालगत टाकली आहे. रामटेक शहरातील बसस्थानकाच्या पुढे असलेल्या वळणावर गुरुवारी (दि. २५) जेसीबीने मातीचे काम सुरू हाेते. या कामात शीतलवाडी-परसाेडा गावाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फाेडण्यात आली.
पाइप फुटल्याने तिथे पाण्याचा माेठ्या प्रमाणात अपव्यय झाला. या राेडच्या कामात ही पाइपलाइन अनेकदा फाेडण्यात आली. ती ठिकठिकाणी जाेडून दुरुस्तही करण्यात आली. या राेडची कामे काळजीपूर्वक करावी. ती करताना पाइपलाइन फुटणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी लेखी सूचना सरपंच मदन सावरकर यांनी अनेकदा बारब्रिक कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली. परंतु, फुटलेली पाइपलाइन दुरुस्त केली जाईल. पाणी वाया गेल्याने काहीही हाेत नाही, अशी उर्मठ उत्तरे कंपनी अधिकारी देत असल्याचा आराेप मदन सावरकर यांनी केला आहे.
याच कामास दुसऱ्या पुलाच्या कामाम पाइपलाइन फाेडण्यात आली. मात्र, ती अद्यापही दुरुस्त करण्यात आली नाही, असेही मदन सावरकर यांनी सांगितले. त्या फुटलेल्या पाइपमधून पाणी वाया जात असल्याने शेवटी पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कंपनीने ही फुटलेली पाइपलाइन तातडीने दुरुस्त करावी तसेच भविष्यात पाइपलाइन फाेडू नये, अशी मागणीही सरपंच मदन सावरकर यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
...
सरपंच थाेडक्यात बचावले
नळयाेजनेची पाइपलाइन वारंवार फाेडली जात असल्याने गावाचा पाणीपुरवठा खंडित हाेताे. पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांची ओरड सुरू हाेते. पाइपलाइन नुकतीच फाेडल्याने शीतलवाडीचे सरपंच मदन सावरकर यांनी गुरुवारी (दि. २५) पाइपलाइनची पाहणी करायला सुरुवात केली. त्यांना पुलाच्या खड्ड्याजवळ ती पाइपलाइन फुटली असल्याचे आढळून आले. पाहणी करीत असताना ताेल गेला आणि मदन सावरकर त्या खड्ड्यात पडले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांना लगेच बाहेर काढले. सुदैवाने यात त्यांना फारसी गंभीर दुखापत झाली नाही.