निराधारांची पायपीट; सहा महिन्यापासून अनुदानच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 11:01 AM2021-02-04T11:01:03+5:302021-02-04T11:01:30+5:30
Nagpur News संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या सहा महिन्यापासून अनुदानच नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या सहा महिन्यापासून अनुदानच नाही. या योजनेतील वयोवृद्ध लाभार्थी अनुदानासाठी पायपीट करीत आहेत. त्यामुळे हे अनुदान नेमके कुठे अडले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संजय गांधी योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा ६०० रुपये व एकापेक्षा अधिक कुटुंब असणाऱ्यांना ९०० रुपये मिळतात. नागपूर जिल्ह्यात जवळपास एक लाखावर लाभार्थी आहेत. लाभार्थी दररोज बँकांच्या चकरा मारताहेत. परंतु त्यांना पुढच्या महिन्यात पैसे जमा होतील, असे सांगितले जात आहे. गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यापासून अनुदान मिळालेले नाही, तर काही लाभार्थ्यांना तर जुलैपासूनचे अनुदान मिळालेले नाही. कोरोनाच्या काळात गरीब, निराधारांचे हाल झाले. अशा परिस्थितीत या निराधार लोकांना अनुदान मिळाले नसल्याने त्यांचे काय हाल झाले असतील, याची कल्पनाही करविली जात नाही.
बँकेत गेल्यावर अनुदानच जमा झाले नसल्याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे अनेक वयोवृद्ध लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात येऊन विचारपूस करतात. परंतु त्यांनाही केवळ पोकळ आश्वासन देऊन परत पाठविले जात आहे. तेव्हा या निराधारांनी करायचे तरी काय, असा प्रश्न उपस्थित करीत तातडीने अनुदान मिळावे, अशी मागणी अनेक लाभार्थ्यांनी केली आहे.