नागपुरात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यावर ताणले पिस्तूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:30 AM2019-09-16T11:30:06+5:302019-09-16T11:32:03+5:30
गणेशमूर्तीचे विसर्जन करून परत आलेल्या गणेश मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याला एका गुंडाने कारचा कट मारला. त्याला कार सरळ चालव म्हणून सल्ला दिल्यामुळे गुंड आणि त्याच्या साथीदाराने शिवीगाळ करून पिस्तूल ताणले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशमूर्तीचे विसर्जन करून परत आलेल्या गणेश मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याला एका गुंडाने कारचा कट मारला. त्याला कार सरळ चालव म्हणून सल्ला दिल्यामुळे गुंड आणि त्याच्या साथीदाराने शिवीगाळ करून पिस्तूल ताणले. त्यामुळे संतप्त गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पिस्तूल ताणणाऱ्या गुंडाची बेदम धुलाई केली. त्याच्या साथीदारांनाही चोप दिला आणि त्याच्या वाहनाचीही तोडफोड केली. काचीपुरा चौकात रविवारी पहाटे १.३० ते २ च्या सुमारास झालेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते. दोन्हीकडील ‘मोठी’ मंडळी ठाण्यात पोहचल्यानंतर गुंडाच्या टोळीकडून माफीनाम्याची भाषा झाली अन् वादावर पडदा पडला.
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करून मध्यरात्री परतले. बजाजनगर चौकातील एका भोजनालयात जेवण घेतल्यानंतर हे सर्व घरी जाण्याच्या तयारीत असताना पहाटे १.४५ च्या सुमारास गुंडाची कार सिनेस्टाईल भोजनालयासमोर थांबली. गुंडाच्या टोळीच्या म्होरक्याने मंडळाच्या प्रमुखाला कारचा कट मारला. पायावरून कारचे चाक जाणार असल्याचे लक्षात आल्याने मंडळ प्रमुखाने प्रसंगावधान राखत बाजूला उडी घेतली. त्यानंतर कार चालविणाऱ्या गुंडाला सरळ कार चालविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गुंडाने अरेरावी करीत शिवीगाळ केली. पिस्तूलही ताणले. ते पाहून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दारूच्या नशेत टुन्न असलेल्या गुंडाला बाहेर खेचून त्याची तसेच त्याच्या साथीदारांची बेदम धुलाई केली. मंडळाचे कार्यकर्ते हावी झाल्याचे पाहून गुंड आणि त्याचे साथीदार सैरावैरा पळाले. त्यांनी आपल्या साथीदारांना फोन करून बोलवून घेतले. इकडे काही जणांनी गुंडाच्या महागड्या कारची तोडफोड केली. दरम्यान, गुंडाचे काही साथीदार बजाजनगर ठाण्यात पोहचले, तर मंडळाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येत ठाण्यात पोहचले. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. पहाटे ३ वाजेपर्यंत दोन्हीकडून एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदविण्याची भाषा वापरली जात होती. गुंड शहरातील एका खतरनाक टोळीचे सदस्य असल्याचे लक्षात आल्याने, रात्रपाळीवर असलेले अनेक पोलीस अधिकारी बजाजनगर ठाण्यात पोहचले. दुसरीकडे दोन्ही गटाकडून काही ‘मोठी’ मंडळी ठाण्यात पोहचली. काहींनी फोनवरूनही समेटाचे प्रयत्न केले. त्यानंतर दोन्ही गटांनी ठाण्यातून काढता पाय घेतला.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
महागड्या कारची मोठी तोडफोड झाल्याची तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीची ओळख पटविण्यात येणार असल्याचे बजाजनगर पोलिसांनी यासंबंधाने सांगितले.