पिस्तुलाच्या धाकावर दरोडा
By Admin | Published: October 25, 2014 02:35 AM2014-10-25T02:35:07+5:302014-10-25T02:35:07+5:30
पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी एका कंत्राटदाराच्या घरातून सोने आणि रोख रक्कमेसह अडीच लाखांचा ऐवज लंपास केला.
नागपूर : पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी एका कंत्राटदाराच्या घरातून सोने आणि रोख रक्कमेसह अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डांगोरे लेआऊटमध्ये गुरुवारी पहाटे ही दरोड्याची घटना घडली.
मॉडेल स्कूल, गजानन मंदिरजवळ ब्रिजेश रूस्तमदास पटेल (वय ३५) यांचे निवासस्थान आहे. ते कोराडीच्या प्रकल्पात मजूर पुरवितात. गुरुवारी पहाटे २.३० वाजता पटेल दाम्पत्य गाढ झोपेत असताना सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. मौल्यवान चीजवस्तू आणि रोकड शोधत असताना झालेल्या आवाजामुळे पटेल दाम्पत्याला जाग आली. त्यांनी उठून बघितले असता सात दरोडेखोर दिसले. बहुतांश जणांच्या तोंडावर स्कार्फ बांधला होता. पटेल दाम्पत्याने आरडाओरड करीत आपल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी पिस्तूल, चाकू तसेच स्क्रू ड्रायव्हरचा धाक दाखवून त्यांना गप्प केले. जीवे मारण्याची धमकी देऊन दरोडेखोरांनी त्यांना रोख आणि मौल्यवान चीजवस्तूंची मागणी केली. जीव धोक्यात असल्याचे लक्षात आल्यामुळे पटेल यांच्या पत्नीने घरातील तसेच अंगावरील दागिने आणि रोख ३८ हजार, असा २ लाख, ४२ हजारांचा ऐवज दरोडेखोरांच्या हवाली केला. आहे तेवढे घेऊन जा मात्र आम्हाला दुखापत करू नका, अशी विनवणी करीत पटेल दाम्पत्य एका ठिकाणी बसून राहिले. आणखी घरात काहीच मिळत नसल्याचे पाहून अर्ध्या तासानंतर दरोडेखोर पळून गेले. ते दूर निघून गेल्याची खात्री पटल्यानंतर पटेल यांनी पोलिसांना माहिती दिली.
दरोड्याची घटना घडल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने पटेल यांच्या घरासमोर बघ्यांची मोठी गर्दी जमली. कोराडीचे ठाणेदार महाले, एपीआय तुमडाम आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहचले. दरोडेखोरांनी पटेल यांच्या दारासमोर दोन चपला ठेवल्या होत्या. पोलिसांनी श्वान पथकाला बोलवून दरोडेखोरांचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्वान काही अंतरापर्यंत जाऊन परत फिरला.