कुख्यात पिन्नू पांडेकडून पिस्तूल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:09 AM2021-01-25T04:09:03+5:302021-01-25T04:09:03+5:30
नागपूर - शहरातील कुख्यात गुंड पिन्नू ऊर्फ कुलदीप शशिधर पांडे (वय ३०) याला तहसील पोलिसांनी आज सिनेस्टाइल पकडले. तत्पूर्वी ...
नागपूर - शहरातील कुख्यात गुंड पिन्नू ऊर्फ कुलदीप शशिधर पांडे (वय ३०) याला तहसील पोलिसांनी आज सिनेस्टाइल पकडले. तत्पूर्वी त्याच्या एका साथीदाराला अटक करून त्याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल जप्त केली होती. या दोघांना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला आहे.
गुरुवारी मध्यरात्री होंडा सिटी कारमधून (एमएच ०२ - बीजे ३२८४) कुख्यात पिन्नू पांडे येत असल्याची टीप मिळाल्याने तहसील पोलिसांनी भगवाघर चाैकात सापळा लावला. पोलिसांना पाहून कारमधून नोगल कैलास पाटील (वय २८) खाली उतरला. तर, पिन्नू पोलिसांना हुलकावणी देऊन सुसाट वेगाने पळून गेला. पोलिसांनी आरोपी पाटीलजवळून एक पिस्तूलही जप्त केले. त्याची रात्रभर झाडाझडती घेतली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास गड्डीगोदाममधील गोलबाजार परिसरात छापा घालून पिन्नू पांडेच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून होंडासिटी कारही जप्त करण्यात आली. त्याला आज न्यायालयात हजर करून त्याचा २ दिवसांचा पीसीआर मिळवला. अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलचे ठाणेदार जयेश भंडारकर, निरीक्षक बलरामसिंग परदेशी, हवलदार समीर शेख, रवींद्र पाटील, नायक नाझिर शेख, सचिन नितवणे, प्रवीण लांडगे, हेमंत पराते, पंकज बागडे, युनूस खान, अजित ठाकूर, नितीन राठोड यांनी ही कामगिरी बजावली.
----
कुणाचा गेम प्लान?
पिन्नू पांडे हा खतरनाक गुंड असून, त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला मकोका आणि एमपीडीएही लावण्यात आला आहे. पिन्नू गिट्टीखदानमधील अवस्थी नगरात राहतो. त्याचे त्याच भागातील खतरनाक गुंड सुमीत ठाकूर आणि त्याच्या टोळीशी वैमनस्य आहे. चंद्रपुरातील ईरफान चाचू नामक गुंडाशीही तो कनेक्ट आहे. पिन्नू कुणाचा गेम करण्याचे कटकारस्थान करीत होता का, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.
----