पिस्तूल, दोन दुचाकी जप्त
By Admin | Published: May 26, 2017 02:46 AM2017-05-26T02:46:21+5:302017-05-26T02:46:21+5:30
शहरातील गणेशनगरस्थित अमित ज्वेलर्समध्ये रविवारी (दि. १४) दुपारी टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोडाप्रकरणात
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : शहरातील गणेशनगरस्थित अमित ज्वेलर्समध्ये रविवारी (दि. १४) दुपारी टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोडाप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना रविवारी (दि. २१) मध्यरात्री अटक केली. या पाचही दरोडेखोरांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी गुरुवारी (दि. २५) सकाळी एक पिस्तूल आणि दोन मोटरसायकली जप्त केल्या. या दोन्ही मोटरसायकली रामटेक येथील विद्यार्थ्यांच्या असून, दरोडेखोरांनी काम असल्याची बतावणी करीत त्यांना मागितल्या होत्या. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने योगेश फुलसिंग यादव (२५, रा. कन्हान), आर्येन ऊर्फ नीतेश मुन्नेलाल राठोर (२४, रा. कन्हान), जितेंद्र ऊर्फ भुरू मारुती धोटे (३८, रा. रामनगर, गोंदिया), समीर रमाकांत लुटे (२३, रा. रामटेक) व प्रफुल्ल ऊर्फ पीयूष अंबादास जांगडे (२५, रा. रामटेक) या पाच जणांना अटक केली. सुरुवातीला त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि २४ हजार रुपये रोख रकमेसह अन्य साहित्य जप्त केले होते. शिवाय, न्यायालयाने या पाचही जणांना शुक्रवारपर्यंत (दि. २६) पोलीस कोठडी सुनावली होती.दरम्यान, पोलिसांनी या पाचही जणांची कसून चौकशी केली. त्यात त्यांनी घटनेच्यावेळी वापरलेले अन्य एक पिस्तूल आणि दोन मोटरसायकली जप्त केल्या.