समता नगरातील रस्त्यावर जागोजागी खड्डे व चिखल()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:01+5:302021-06-21T04:07:01+5:30
नागरिकांचे आरोग्य धोक्यात : प्रशासनाचे नागरी सुविधाकडे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असल्याचा दावा ...
नागरिकांचे आरोग्य धोक्यात : प्रशासनाचे नागरी सुविधाकडे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असल्याचा दावा केला जात असतानाच शहरातील काही भागातील नागरिकांना रस्ते, पाणी, पथदिवे, सिवरेज अशा मूलभूत सुविधासाठी संघर्ष करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही समस्या सुटत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक १ मधील समता नगर येथील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
समता नगरात प्रामुख्याने कामगार, मजूर व गरीब लोकांचे वास्तव्य आहे. पावसाला सुरुवात होताच रस्त्यावर सर्वत्र चिखल साचला आहे. जागोजागी पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. काही रस्त्यांवर पथदिवे नसल्याने नागरिकांना रात्रीला अंधाराचा सामना करावा लागतो. खड्डे व चिखलामुळे वाहने घरी ठेवावी लागतात. ये-जा करता येत नाही. जोराचा पाऊस आल्यास रस्त्यावर पाणी साचते, अशी व्यथा नागरिकांनी मांडली. या परिसरातील रस्त्यांची कामे तातडीने करावी, अशी मागणी मनपातील राष्ट्रवादीचे माजी गटनेते वेदप्रकाश आर्य यांनी केली आहे.
....
पावसाळी नाल्याचा अभाव
डांबरी वा सिमेंटचा रस्ता नसल्याने पावसाळी नाल्याची कामे झालेली नाही. यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता साचून राहते. सिवरेज लाईनची व्यवस्था नसल्याने विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
....
तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर चिखल होत असल्याने ये-जा करताना त्रास होत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. परंतु मनपाकडे तक्रार करूनही याची दखल घेतली जात नाही. प्रभागातील नगरसेवकही लक्ष देत नाही, अशी व्यथा नागरिकांनी मांडली.