खड्ड्यांमुळे करावा लागताेय जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:08 AM2021-03-15T04:08:54+5:302021-03-15T04:08:54+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यातील मोरगाव-धर्मापुरी-मौदा मार्गाच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदाराला वेळेवर बिले अदा करण्यात न आल्याने थंडबस्त्यात ...

Pits are a life threatening journey | खड्ड्यांमुळे करावा लागताेय जीवघेणा प्रवास

खड्ड्यांमुळे करावा लागताेय जीवघेणा प्रवास

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : माैदा तालुक्यातील मोरगाव-धर्मापुरी-मौदा मार्गाच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदाराला वेळेवर बिले अदा करण्यात न आल्याने थंडबस्त्यात गेले आहे. त्यामुळे खड्डेमय असलेला हा मार्ग धाेकादायक बनला असून, त्यावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. परिणामी, या मार्गाच्या दुरुस्तीला पुन्हा कधी सुरुवात करणार, असा प्रश्नही या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मोरगाव-धर्मापुरी-मौदा हा मार्ग महत्त्वाचा असून, तालुक्यातील धर्मापुरी, तांडा, मोरगाव, रेवराल, खंडाळा, पिपरी, आष्टी, नवरगाव, चारभा, सुंदरगाव, मांगली (तेली), आजनगाव, धामणगाव, निमखेडा, अरोली यासह एकूण २२ गावांना जाेडला आहे. या गावांमधील नागरिकांना माैदा व इतर शहरांमध्ये जाण्यासाठी याशिवाय दुसरा मार्ग नाही. दुरुस्तीअभावी या मार्गाच्या काही भागांची दैनावस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे त्या मार्गावरून पायी चालणे अवघड झाले असून, वाहने चालविताना कसरत करावी लागते.

राज्य शासनाने निधी मंजूर केल्याने या मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली हाेती. बिलाअभावी कंत्राटदाराने काम थांबविले. त्यामुळे या मार्गाच्या दुरुस्तीचे काम पुढे सरकू शकले नाही. त्यामुळे हा तिढा साेडविण्यासाठी या भागातील नागरिकांनी राधा अग्रवाल यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याशी चर्चा करून काम पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली हाेती. राजाेली-पारडीदरम्यान माेठमाेठे खड्डे तयार झाल्याने नागरिकांना आठवडी बाजाराला जाताना व शेतमालाची वाहतूक करताना त्रास सहन करावा लागताे. या मार्गावर वारंवार हाेणारे अपघात व नागरिकांची गैरसाेय टाळण्यासाठी त्याची तातडीने दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणीही योगेश देशमुख, दीपक गेडाम, अनिल बुराडे या लाेकप्रतिनिधींसह नागरिकांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

...

१०.५७ काेटी रुपये मंजूर

या मार्गाच्या दुरुस्तीसाठी मागच्या पंचवार्षिकमध्ये राज्य शासनाने १० काेटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला हाेता. त्याअनुषंगाने कामाचे कंत्राट देण्यात आले. कार्यादेश काढण्यात आल्याने कंत्राटदाराने कामाला सुरुवातही केली. यात कंत्राटदाराने दहेगाव ते खातदरम्यानच्या राेडचे काम पूर्ण केले. त्यामुळे कंत्राटदाराने सहा काेटी रुपयांचे काम पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शासनाकडे बिलाची मागणी केली. शासनाने बिले न दिल्याने कंत्राटदाराने मार्गाचे काम मध्येच थांबविले.

...

मंजुरीचा तिढा

या मार्गावरील माैदा ते सुंदरगावदरम्यानच्या दुरुस्ती व रुंदीकरणाला अद्यापही मंजुरी मिळाली नाही, अशी माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. या मार्गावर ठिकठिकाणी तयार झालेले खड्डे अपघाताला निमंत्रण देत असून, उंच, सखल राेड, त्यावरील खड्डे, विखुरलेली गिट्टी यामुळे दुचाकी वाहने स्लीप हाेऊन अपघात हाेण्याचे आणि त्या अपघातांमध्ये जखमी हाेण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. हलक्या चारचाकी वाहनांचे इंजिन जमिनीला लागत असल्याने दुचाकीसह चारचाकी वाहनांचेही नुकसान हाेते.

Web Title: Pits are a life threatening journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.