निवडणुकीमुळे आठवले शहरातील खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:11 AM2021-09-09T04:11:44+5:302021-09-09T04:11:44+5:30
- सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थित केला मुद्दा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. नागरिकांत प्रचंड नाराजी ...
- सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थित केला मुद्दा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. त्यात निवडणूक नजिक आल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांना खड्ड्यांची आठवण झाली आहे. बुधवारी मनपा सभागृहात खड्ड्यांवर रोष व्यक्त केला.
कोरोना संक्रमणामुळे मागील दोष वर्षांत शहरातील विकास ठप्प आहे. पदाधिकारी व अधिकारीही यावर गप्प होते. रस्त्यावर खड्डे असूनही दुरुस्ती झाली नसल्याने कबुली मनपा प्रशासनाने बुधवारी सभागृहात दिली. प्रभाग ६ मधील खड्ड्यांच्या समस्येबाबत उपस्थित प्रश्नावरून शहरातील सर्वच भागात खड्डे असल्याची आठवण झाली. नगरसेवकांनी प्रशासनावर आपला रोष व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या निर्देशामुळे कामे ठप्प असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. यावरून पुढील काही महिने नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सोसावा लागणार आहे.
प्रश्नोत्तराच्या तासात वैशाली नारनवरे यांनी प्रभाग ६ मधील रस्त्यांची चाळण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. अधिकारी नगरसेवकांचे फोन उचलत नाहीत. तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला. काँग्रेसचे हरीश ग्वालबंशी म्हणाले, शहरातील युवक रस्त्यावरील खड्ड्यांना महापौर, आयुक्त व पदाधिकाऱ्यांची नावे देत आहेत. मनपाची बदनामी होत आहे. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी खड्ड्यांचा प्रश्न एका प्रभागापुरता मर्यादित नसून संपूर्ण शहरात ही समस्या असल्याचे निदर्शनास आणले. खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी केली. स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर म्हणाले, शहरात मनपाशिवाय नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेही रस्ते आहेत. रस्ता कुणाचा याचा फलक लावला जावा, यामुळे मनपाची बदनामी होणार नाही. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विजय झलके यांनीही रस्ते दुरुस्तीची मागणी केली.
...जोड आहे...