नागपूरच्या रस्त्यावरील खड्डे आणि सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 01:59 PM2021-09-27T13:59:51+5:302021-09-27T15:13:38+5:30
आजकाल मीम्स हे सोशल मिडीयाचं एक प्रमुख हत्यार बनलंय. एखाद्या फोटो किंवा व्हिडिओवर साध्या सोप्या आणि सरळ शब्दात थेट संदेश मीम्सच्या माध्यमातून दिला जातो. सध्या नागपूरच्या रस्त्यावरील खड्डयांना मीम्सकऱ्यांनी टार्गेट केले आहे.
नागपूर : नागपुरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यात पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांचे रुपांतर पाण्याच्या डबक्यासारखे होते. सामान्य नागरिकांना येता-जाता याचा अतोनात त्रास सहन करावा लागतो. मात्र, यावर काही ठोस पावलं उचलण्यात आलेली नाही. तर, आता याच खड्डयांवरचे मीम्स हे तुफान व्हायरल होत आहेत.
नागपूर शहरातील रस्ते आणि त्यावरील खड्डे बघितल्यावर त्यांचे जणू ७ जन्मांचे अतुट नाते असल्याची प्रचिती येते. या रस्त्यांची अवस्था किती दयनीय असावी आणि प्रशासनाचे याकडे किती लक्ष आहे, याचाही अंदाजा यावरुन येतो. यातूनच तरुनाईला खड्ड्यांच्या मीम्सची भन्नाट कल्पना सुचलेली दिसते. रस्ते आणि प्रशासनाला मीम्सकरांनी सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल केले आहे.
पावसासोबत नागपूरच्या रस्त्यांवर मीम्सचाही पाऊस पडतोय. एका मीममध्ये 'जेव्हा तुम्ही पावसात नागपुरच्या रस्त्यावरुन जाता' तेव्हा चंद्रावर असलेल्या खड्ड्यांपेक्षाही जास्त खड्डे या रस्त्यांवर असल्याचे जाणवते, असे लिहीले आहे. अशाच प्रकारे अनेक मीम्स सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून आतातरी प्रशासनाला जाग येते का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.