पीयूष हाऊसिंग एजन्सीला ग्राहक आयोगाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:07 AM2021-06-26T04:07:32+5:302021-06-26T04:07:32+5:30
नागपूर : शहरातील पीयूष हाऊसिंग एजन्सीला एका प्रकरणात अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका बसला. तक्रारकर्त्या महिलेचे १ ...
नागपूर : शहरातील पीयूष हाऊसिंग एजन्सीला एका प्रकरणात अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका बसला. तक्रारकर्त्या महिलेचे १ लाख १० हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश आयोगाने एजन्सीला दिला. व्याज ४ ऑगस्ट २०१८ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले. तसेच, तक्रारकर्त्या महिलेला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १५ हजार व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कम एजन्सीनेच द्यायची आहे.
प्रमिला अमृते असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव असून त्या मिनीमातानगर येथील रहिवासी आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, अमृते यांनी पीयूष हाऊसिंग एजन्सीच्या मौजा घोरपड, ता. कामठी येथील ले-आऊटमधील एक भूखंड २ लाख ११ हजार ६०० रुपयात खरेदी करण्यासाठी २१ एप्रिल २०१६ रोजी करारनामा केला. त्यानंतर एजन्सीला वेळोवेळी १ लाख १० हजार रुपये अदा केले. दरम्यान, संबंधित जमीन वाणिज्यिक वापराकरिता अकृषक करण्यात आल्याची माहिती अमृते यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी एजन्सीला नोटीस बजावून संपूर्ण रक्कम परत मागितली. परंतु, एजन्सीने त्यांना प्रतिसाद दिला नाही. परिणामी, अमृते यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. त्यानंतर एजन्सीने ग्राहक आयोगाची नोटीस तामील होऊनही स्वत:ची बाजू मांडली नाही. करिता, आयोगाने तक्रारीवर एकतर्फी कारवाई करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर सदर निर्णय दिला.
--------------
अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब
पीयूष हाऊसिंग एजन्सीने २०१९ मध्ये संबंधित जमीन वाणिज्यिक उपयोगाकरीता अकृषक केली. सात-बारा उताऱ्यामध्ये तसा उल्लेख आहे. परंतु, एजन्सीने त्यापूर्वी म्हणजे, २०१६ मध्ये अमृते यांना रहिवासी उपयोगाकरीता भूखंड विकला आहे. एजन्सीची ही कृती अनुचित व्यापार प्रथेत मोडणारी आहे. त्यामुळे अमृते यांना मानसिक त्रास सहन करावा लागला असे निरीक्षण आयोगाने निर्णयात नोंदवले.