अंधारकोठडीतील हाताची 'कृती' करणार जागोजागी प्रकाशपेरणी
By नरेश डोंगरे | Published: November 6, 2023 09:16 PM2023-11-06T21:16:20+5:302023-11-06T21:16:29+5:30
पाच हजार पणत्या तिमिरातून तेजाकडे : दिवाळीत अंधार आणि उजेडाचे पैलू प्रकाशात
नागपूर: ते स्वत: अंधारकोठडीत आहेत. त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबियांसोबत स्वत:च्या घरी दिवाळी साजरी करून प्रकाशपर्वाचा आनंद घेऊ शकत नाही. मात्र, त्यांनी तयार केलेली कलाकृती अनेकांच्या घरासमोरचा अंधार दूर करून जागोजागी प्रकाशपेरणी करणार आहे.मानवी जिवनातील अंधार आणि उजेड अशा दोन्ही पैलू प्रकाशात आणणारी ही घडामोड आहे.
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात २८०० पेक्षा जास्त बंदीवान आहेत. त्यातील १२०० पेक्षा जास्त कैदी विविध गुन्ह्यात शिक्षा सुनावण्यात आलेले अर्थात दोष सिद्ध झालेले कैदी आहेत. यातील ३० ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त कैदी रागाच्या भरात हातून घडलेल्या गुन्ह्यामुळे कारागृहातील अंधारकोठडीत पोहचलेले आहेत. तर, काहींच्या वाट्याला चुकीच्या व्यक्तींच्या संगतीमुळे कारागृहातील जीवन आले आहे. ही मंडळी गुन्हेगारी वृत्तीची नसल्याने त्यांच्यासाठी कारागृहातील प्रत्येक क्षण मोठा असतो. रोजचा दिवस कसा ढकलायचा, अशा मानसिकतेत ते खिन्नपणे कारागृहात जगत असतात. खिन्नता दूर सारण्यासाठी स्वत:ला कोणत्या ना कोणत्या 'कारागिरीत' गुंतवून घेतात. कुणी पेंटींग करतो, कुणी फर्निचर बनवितो तर कुणी वेगवेगळ्या वस्तू तयार करून जड झालेले जगणे सहज करण्याचा प्रयत्न करतात. अशा कैद्यांचे वर्तन आणि त्यांच्यातील कला हेरून कारागृहाचे अधिकारीही त्यांना प्रोत्साहित करीत असतात. त्यांच्या कलेची जोपासणा करीत विविध सणोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्याकडून वेगवेगळ्या कलाकृतीही बणवून घेतात.
सध्या दिवाळीचे प्रकाशपर्व तोंडावर आहे. ते लक्षात घेऊन आकाश दिवे, पणत्या, तयार करून घेण्यावर महिनाभरापूर्वी भर देण्यात आला होता. त्यासाठी कारागृहाच्या मालकीच्या शेतातील माती कसली गेली होती. या मातीतून कारागृहात बंदीवानांनी थोड्या-थोडक्या नव्हे तर तब्बल पाच हजारांवर पणत्या साकारल्या. अत्यंत सुबक अशा या पणत्या आता बाजारात विकल्या जाणार आहेत.
ज्या महिला-पुरुष कैद्यांनी या पणत्या, आकाश दिवे तयार केले. ते स्वत: अंधारकोठडीत बंद असल्यामुळे घरी जाऊन ते स्वत:च्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करू शकत नाही. मात्र, अंधारकोठडीतील हाताने निर्माण केलेल्या या पणत्या यंदाच्या प्रकाशपर्वात जागोजागी प्रकाश पेरणार आहेत.
आज दिवाळी मेळावा
बंदीवानांनी तयार केलेल्या विविध कलाकृती आणि वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीला मंगळवारी, ७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने आयोजित 'दिवाळी मेळावा' कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवारी सकाळी ९ वाजता होणार आहे. मध्यवर्ती कारागृहात आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन प्रमूख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. बी. अग्रवाल हे करणार आहेत.