‘कोरोना’च्या काळातदेखील अभियांत्रिकीच्या ४३ टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 11:12 PM2020-12-15T23:12:45+5:302020-12-15T23:15:04+5:30
Engineering students Placement नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४३ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचे थेट ‘प्लेसमेंट’ झाले. हा आकडा प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये झालेल्या मुलाखतींचा असून ‘ऑफ कॅम्पस’मध्येदेखील अनेकांची निवड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०२० हे वर्ष महाविद्यालयांसोबतच विद्यार्थ्यांचीदेखील परीक्षा पाहणारे ठरले आहे. या वर्षी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेंट’मध्ये प्रचंड घट होईल, असे अंदाज वर्तविण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४३ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचे थेट ‘प्लेसमेंट’ झाले. हा आकडा प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये झालेल्या मुलाखतींचा असून ‘ऑफ कॅम्पस’मध्येदेखील अनेकांची निवड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विभागात एकूण ४४ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यातील अनेक महाविद्यालयांमध्ये २०१९ पासून ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रक्रियेला सुरुवात झाली. तब्बल १ हजार १३३ कंपन्या ‘प्लेसमेंट’साठी महाविद्यालयात आल्या. ‘ऑफलाईन’ व ‘ऑनलाईन’ पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्या. तर ‘पूल कॅम्पस’अंतर्गत ३७३ कंपन्यांसमोर विद्यार्थी मुलाखतीसाठी गेले. अंतिम वर्षाच्या १३ हजार १९९ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ७८६ विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले. या विद्यार्थ्यांची टक्केवारी ४३.८३ टक्के इतकी आहे.
विभागातील महाविद्यालयांपैकी ३२ ठिकाणी ‘नॅक’ची मान्यता आहे, तर ४० अभ्यासक्रमांना ‘एनबीए’चा दर्जा आहे. ही टक्केवारी अनुक्रमे ७२.७३ टक्के व १७.६२ टक्के इतकी आहे.
राज्यात नागपूर विभागाचा वाटा १३ टक्के
‘एआयसीटीई’च्या आकडेवारीनुसार २०१९-२० मध्ये महाराष्ट्रात अभियांत्रिकीच्या एकूण ४३ हजार ९४६ विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले. यात नागपूर विभागातील विद्यार्थ्यांची आकडेवारी १३.१७ टक्के इतकी आहे. नागपूर विभागात नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो.
विभागातील महाविद्यालयांचा दर्जा वाढतोय
नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दर्जा वाढतो आहे. ‘प्लेसमेंट’साठी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात येते. शिवाय ‘नॅक’ची मान्यता व ‘एनबीए’चा दर्जा घेण्याकडेदेखील कल दिसून येत असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. राम निबुदे यांनी दिली.
अशी आहे आकडेवारी
विभागातील महाविद्यालये : ४४
‘कॅम्पस’मध्ये आलेल्या कंपन्या : १,१३३
‘पूल कॅम्पस’साठी आलेल्या कंपन्या : ३७३
अंतिम वर्षातील विद्यार्थी : १३,१९९
‘प्लेसमेंट’ मिळालेले विद्यार्थी : ५,७८६
सर्वाधिक ‘पॅकेज’ : ४४ लाख
सर्वात कमी ‘पॅकेज’ : दीड लाख