फिर्यादीच निघाला चोर; मित्रासोबत मिळून केला बॅग लिफ्टिंगचा ड्रामा, पण..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 05:55 PM2022-11-24T17:55:48+5:302022-11-24T17:56:23+5:30
कर्ज फेडण्यासाठी रचला बनाव : सीसीटीव्हीतून उलगडले सत्य
नागपूर : लकडगंज येथील कच्छी विसा मैदानाजवळ सिगारेट विकणाऱ्या सेल्समनला लुटल्याच्या प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने भंडाफोड केला आहे. याप्रकरणी फिर्यादीने त्याच्या मित्रासोबत लुटीची खोटी गोष्ट रचली होती व बॅग लिफ्टिंगचा ड्रामा केला होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या मालासह रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
तांडापेठ येथील खुशाल धनराज वाघ हा २२ वर्षीय तरुण सिगारेट कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो. त्याच्यावर सुमारे चार लाखांचे कर्ज आहे. कर्जामुळे त्याने त्याचा मित्र आरोपी विशाल भावेश माटागडे (२०, जुनी मंगळवारी) याच्यासोबत मिळून लुटीचे हे संपूर्ण नाट्य रचले होते; मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमुळे आरोपीचे संपूर्ण रहस्य उलगडले. पोलिसांच्या चौकशीत खुशालने सत्याची कबुली दिली.
मंगळवारी दिवसभर सिगारेट विकल्यानंतर आरोपी खुशाल त्याच्या दुचाकीने ४५ हजारांची रोकड व ३५ हजार रुपयांचा माल घेऊन कच्छी विसा मैदानाजवळ पोहोचला होता. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याचा आरोपी मित्र त्याच्या दुचाकीवर तेथे आला आणि पैसे व सामानाची बॅग घेऊन निघून गेला. खुशालने नंतर त्याच्या बॉसला बॅग चोरी झाल्याचे सांगितले व लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
पोलिसांना खुशालवरच संशय आला. एपीआय पवन मोरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संपूर्ण सत्य शोधण्यास त्यांना वेळ लागला नाही. त्याची कसून चौकशी केली असता खुशालने त्याच्या साथीदारासह हा संपूर्ण प्रकार घडवून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी रोख रक्कम आणि चोरीचा मालही जप्त केला आहे.