‘इसिस’कडून महाराष्ट्रातील तरुणांचे ब्रेन वॉश करण्याचा डाव

By नरेश डोंगरे | Published: October 4, 2023 09:58 PM2023-10-04T21:58:41+5:302023-10-04T21:59:40+5:30

देशभरातील बॉम्बस्फोटात वापरण्याचा कट : तपास यंत्रणांकडून कसून चाैकशी : गोव्यात तळ; महाराष्ट्रात स्फोटाची चाचणी

plan of isis to brainwash the youth of maharashtra | ‘इसिस’कडून महाराष्ट्रातील तरुणांचे ब्रेन वॉश करण्याचा डाव

‘इसिस’कडून महाराष्ट्रातील तरुणांचे ब्रेन वॉश करण्याचा डाव

googlenewsNext

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : देशातील १८ ते २० ठिकाणी रासायनिक स्फोट घडवून भारताला २६/११ पेक्षा मोठी जखम देण्याच्या तयारीत असलेल्या इसिस (आयएसआयएस)च्या दहशतवाद्यांनी कट अंमलात आणण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहरांतील तरुणांचे ब्रेन वॉश करण्याचा डाव टाकला असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. त्यांच्या गळाला कुठले आणि किती तरुण लागले, त्याचा आता कसून शोध घेतला जात आहे.

खास सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयएने दिल्लीत अटक केलेल्या ‘इसिस’च्या दहशतवाद्यांकडून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्यामुळे अनेक राज्यांतील शीर्षस्थ तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरच ठिकठिकाणी छापेमारी होऊ शकते, अशीही सूत्रांची माहिती आहे.

सोमवारी दिल्लीतून एनआयएने ‘इसिस’च्या तीन दहशतवाद्यांना जेरबंद केले. चाैकशीत त्यांच्याकडून झालेल्या उलगड्यानुसार संपूर्ण जगात दहशत निर्माण होईल असे केमिकल्स बॉम्बहल्ले भारतात ठिकठिकाणी करण्याची तयारी दहशतवाद्यांनी केली होती. त्यापैकी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यांतील संभाव्य घातपाताचा खुलासा झाल्याचे समजते. केमिकल्स बॉम्बस्फोटाचा कट फुसका ठरू नये यासाठी या दहशतवाद्यांकडून पुण्याजवळच्या कानिफनाथ घाटातील जंगलाकडे आणि लवासानजीकच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणीही घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती चर्चेला आली आहे. दरम्यान, ज्या भयावह दहशतवादी हल्ल्याची ते तयारी करीत होते, त्या खतरनाक हल्ल्याचा कट यशस्वी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा तसेच मुंबईसह अन्य नगरातील काही तरुणांवर गळ टाकणे सुरू केले होते. त्यांचे ब्रेन वॉश करून त्यांना या कटात सहभागी करण्याची दहशतवाद्यांची योजना होती, अशीही माहिती पुढे आली आहे.

ते तिघे, नाव मुहम्मद!

तब्बल १८ ते २० ठिकाणी हल्ला करून भारतासह संपूर्ण जगालाच हादरा देण्याच्या तयारीत असलेल्या मात्र एनआयएने मुसक्या आवळलेल्या ‘इसिस’च्या तीनही दहशतवाद्यांचे पहिले नाव मुहम्मद आहे. अर्थात मुहम्मद रिजवान अश्रफ (२८), मुहम्मद अर्शद वारसी (२९) आणि मुहम्मद शाहनवाज आलम ऊर्फ अब्दुला ऊर्फ इब्राहीम ऊर्फ प्रिन्स (३१) अशी या अटकेतील दहशतवाद्यांची नावे आहेत. यातील शाहनवाज हा अनेक दिवसांपासून ‘इसिस’साठी काम करतो. तो एनआयएच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत असल्याचीही माहिती आहे. हे तिघेही उच्चशिक्षित असून, यातील एक मुहम्मद जामिया मिलिया इस्लामियातून पीएच.डी. करीत असल्याचेही सांगितले जाते.
 

Web Title: plan of isis to brainwash the youth of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.