नागपुरात जीवनावश्यक वस्तूंसाठी तात्काळ नियोजन करा : पालकमंत्री नितीन राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:20 PM2020-04-15T23:20:01+5:302020-04-15T23:22:05+5:30
नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा व्हावा तसेच विस्थापित बेघर व मजूर व्यक्तींच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था व्हावी यादृष्टीने प्रशासनाने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘लॉकडाऊन’चा कालावधी वाढल्यामुळे नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढणार आहे. या परिस्थितीत प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ नियोजन करावे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा व्हावा तसेच विस्थापित बेघर व मजूर व्यक्तींच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था व्हावी यादृष्टीने प्रशासनाने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. किराणा, भाजीपाला, दूध, औषधी, आरोग्य सेवा व कम्युनिटी किचन या बाबींचा आराखड्यात प्राधान्याने समावेश असावा, असेही त्यांनी सांगितले.
‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज बुधवारी पालकमंत्री राऊत यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. बैठकीत महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अप्पर पोलीस आयुक्त नीलेश भरणे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा उपस्थित होते.
लॉकडाऊन वाढल्यामुळे नागरिकांची आर्थिक अडचण वाढणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भोजनाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. यासाठी कम्युनिटी किचनची व्यवस्था करावी. नागरिकांना लागणारे भोजन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरित करावे. सामाजिक संस्थांना यासाठी निधी देण्यात येईल. यावर पोलीस विभागाने नियंत्रण ठेवावे. नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी बँक ांतील व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.
वैद्यकीय साधनांच्या खरेदीसाठी आमदार निधीतून प्रत्येकी ५० लाख
कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी लागणारी वैद्यकीय साधने घेण्यासाठी आमदार निधीमधून प्रत्येकी ५० लाख निधी घेणेबाबत सर्व आमदारांना पत्र लिहावे, असे पालकमंत्री राऊत यांनी सांगितले. आपत्तीशी लढा देताना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन उपाययोजना व नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
रेशनकार्ड व आधार कार्ड नसलेल्यांनाही मिळावे धान्य
ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे पण रेशनकार्ड नाही तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड व आधारकार्डही नाही अशा नागरिकांना किराणा धान्य किट देण्याबाबत नियोजन करण्यात यावे. ग्रामीण भागात किराणा धान्य किट वाटपाचे काम योग्य पद्धतीने सुरु असून शहरात वाटपाचे नियोजन आवश्यक असल्याचे पालकमंत्री राऊत म्हणाले.