शून्य मृत्यू संख्येसाठी नियोजन करा : राजेंद्र पाटील यड्रावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 08:49 PM2020-08-17T20:49:51+5:302020-08-17T20:52:04+5:30
नागपूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासोबतच शून्य मृत्युसंख्येसाठी नियोजन करा, अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. आरोग्य राज्यमंत्री यांनी सर्व आरोग्य अधिकारी यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाविषयक बाबींचा नागपूर शहर व ग्रामीण भागाचा आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासोबतच शून्य मृत्युसंख्येसाठी नियोजन करा, अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. आरोग्य राज्यमंत्री यांनी सर्व आरोग्य अधिकारी यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाविषयक बाबींचा नागपूर शहर व ग्रामीण भागाचा आढावा घेतला.
सद्यस्थितीत रुग्ण बरे होण्याचा नागपूर जिल्ह्याचा दर ४६.७४ टक्के आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२ डेडीकेटेड कोविड रुग्णालये सुरू झालेली असून एकूण २३ डेडीकेटेड कोविड रुग्णालये (डीसीएच) निश्चित करण्यात आली आहेत. एकूण आयसोलेशन बेड ३२१५, ऑक्सिजन सपोर्टेड २३७० व ७२४ आयसीयू बेड उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त ३४ डीसीएच निश्चित करण्यात आली आहेत. डीसीएचमध्ये एकूण ४४६ व्हेंटिलेटर्स आहेत. तसेच एकूण ५१ कोविड केअर सेंटर निश्चित करण्यात आलेले आहेत. एकूण बेडसंख्या १४,४२८ आहे. सद्यस्थितीत १२ कोविड केअर सेंटर ग्रामीण व ५ कोविड केअर सेंटर महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत आहेत. तपासणीकरिता ७ शासकीय व ६ खासगी प्रयोगशाळा सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीत मनुष्यबळाची उपलब्धता व त्यांच्या मानधनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांना वैद्यकीय महाविद्यालयात पदस्थापना देण्याबाबत चर्चा झाली. बैठकीला आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर, डॉ. अविनाश गावंडे व आरोग्य अधिकारी उपस्थित होते.