गुरनुलेच्या चिटिंग कंपनीचा प्लॅनर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:06 AM2020-11-29T04:06:57+5:302020-11-29T04:06:57+5:30
\Sगुरनुलेच्या चिटिंग कंपनीचा प्लॅनर जेरबंद चंद्रपुरात ठोकल्या बेड्या : प्रेयसीकडून मिळाली टीप लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाठग विजय ...
\Sगुरनुलेच्या चिटिंग कंपनीचा प्लॅनर जेरबंद
चंद्रपुरात ठोकल्या बेड्या : प्रेयसीकडून मिळाली टीप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाठग विजय रामदास गुरनुलेच्या चिटिंग कंपनीचा प्लॅनर सोनू ऊर्फ सुनील गजानन श्रीखंडे (वय ८) याला बेड्या ठोकण्यात प्रतापनगर पोलिसांनी यश मिळवले. त्याच्या बनवाबनवीचा भंडाफोड झाल्यानंतर तो पळून गेला आणि चंद्रपुरात दडून बसला होता. पोलिसांनी आज पहाटे तेथे जाऊन त्याला अटक केली.
सूत्रांच्या माहितीनुसार,
गुरनुलेच्या विविध बोगस कंपन्यांच्या बनवाबनवीचे आणि देशभरातील हजारो नागरिकांना फसविण्याचे प्लॅनिंग आरोपी सोनू श्रीखंडेने केले होते. प्रतापनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुख्य सूत्रधार विजय गुरनुले, जीवनदास दंडारे, रमेश बिसेन, अतुल मेश्राम, अविनाश महाडोले, राजू मोहरले, श्रीकांत निकुरे, ज्ञानेश्वर बावणे, देवेंद्र गजभिये, रोशन कडू आणि तन्मय जाधव या ११ आरोपींना अटक केली. तर गुरनुलेला फसवणुकीचे कटकारस्थान समजावून सांगणारा आणि बदल्यात कोट्यवधी रुपये गिळंकृत करणारा आरोपी सोनू ऊर्फ सुनील श्रीखंडे फरार होता. तो चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस परिसरातून त्याच्या मौदा येथील प्रेयसीच्या सलग संपर्कात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी श्रीखंडेच्या प्रेयसीकडे चौकशी केली असता तो चंद्रपूर येथील रामनगरात लपून असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
या माहितीच्या आधारे शनिवारी पहाटे प्रतापनगर पोलिसांनी चंद्रपूर गाठले आणि त्याला रामनगरमधून अटक केली. त्याच्याकडून महागडा लॅपटॉप, मोबाईल तसेच स्कोडा कार जप्त करण्यात आली.
----
प्रेयसीवर उधळली रक्कम
आरोपी सुनील गजानन श्रीखंडे हा मध्य प्रदेशातील सौंसर (जि. छिंदवाडा) येथील रहिवासी आहे. नागपुरात आल्यानंतर त्याने मौदा येथील एका तरुणीची सूत जुळविले. तो तिच्यावर लाखो रुपये उधळत होता. सोनसाखळी, अंगठी, मोबाईल असे महागडे गिफ्ट तो तिला नियमित देत होता. तिच्या बँक खात्यातही त्याने लाखोची रक्कम जमा केली होती.
विशेष म्हणजे, पोलिसांनी सौंसर येथील त्याच्या नातेवाईकांकडून गुरुवारी रात्री ६८ लाख, ७९ हजार, ४४० रुपये जप्त केले. तत्पूर्वी गुरनुलेच्या अमरावतीतील एका नातेवाईकाकडूनही ४८ लाख, ४८ हजार तसेच मित्राकडून ७ लाख अशी एकूण ५५. ४८ लाखांची रोकड जप्त केली होती.
----
ॲडव्हायझरला दिले एक कोटी
श्रीखंडेने पोलिसांना प्राथमिक चौकशीत बरीच महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यातील एक माहिती अशी की, त्याच्यासोबत कंपनीचे ॲडव्हायझर म्हणून आणखी आठ जण काम करायचे. त्यांना १५ लाखांपासून तो एक कोटी पर्यंतचे कमिशन देण्यात आले आहे. पोलीस आता या आठ अडव्हायझरचीही चौकशी करत आहेत.
--