नियोजन चुकले, निकाल लांबले

By admin | Published: February 25, 2017 02:12 AM2017-02-25T02:12:22+5:302017-02-25T02:12:22+5:30

ईव्हीएम मशीन असल्याने मतमोजणी लवकर पूर्ण होईल. दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती लागतील.

Planning missed, results removed | नियोजन चुकले, निकाल लांबले

नियोजन चुकले, निकाल लांबले

Next

काही ठिकाणी पोलिसांचा आगाऊपणा : पत्रकारांनाच रोखले
नागपूर : ईव्हीएम मशीन असल्याने मतमोजणी लवकर पूर्ण होईल. दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती लागतील. परंतु प्रशासनाचे नियोजन चुकले. निकालासाठी सायंकाळ झाली. काही ठिकाणी तर निकालासाठी रात्री ९ वाजेपर्यंत वाट पाहावी लागली. इतकेच नव्हे तर काही झोनमधील मतमोजणी केंद्रावर जाण्यापासून पत्रकारांनाच पोलिसांनी रोखले. निवडणूक आयोगाचे तसे निर्देश असल्याचा आगाऊपणादेखील काही पोलिसांनी केला. त्यामुळे गोंधळ उडाला. एकूणच निवडणूक आयोग आणि महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन सपशेल चुकल्याचे दिसून आले आहे.


सतरंजीपुरामध्ये ‘एसीपी’ रिना जनबंधूची पत्रकारांशी उद्धट वागणूक
सतरंजीपुरा झोनची मतमोजणी सतरंजीपुरा झोनच्या नवीन इमारतीमध्ये करण्यात आली. या केंद्रावर रात्री पोलिसांनी लाठीहल्ला सुरू केला. लाठीहल्ल्याची माहिती मिळताच मतमोजणी केंद्रावर उपस्थित पत्रकार केंद्राबाहेर धावले. त्यांनी लाठीहल्ल्याचे चित्रीकरण कॅमेरा आणि मोबाईलमध्ये सुरू केले. लाठीहल्ला कॅमेऱ्यात बंद करीत असल्याचे पाहून पोलिसांनी पत्रकारांना मारहाण सुरू केली.
यावेळी लकडगंजच्या सहायक पोलीस आयुक्त रिना जनबंधू यांनी पत्रकारांना तुमची ड्युटी मत मोजणीची आहे, तुम्ही बाहेर कुणाला विचारून आले, अशी विचारणा करून पत्रकारांसोबत दमदाटी सुरू केली. त्या पत्रकारांची दमदाटी करीत असताना त्यांच्या सोबतचे पोलीस पत्रकार आणि छायाचित्रकारांना वाईट शिवीगाळ करीत होते. आम्ही आमची ड्युटी बजावत आहोत, जेथे प्रसंग घडला तेथे आम्हाला जावे लागते, असा पत्रकारांनी रिना जनबंधू यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पत्रकारांचे काहीच न ऐकता त्यांचा कॅमेरा, मोबाईल ताब्यात घेऊन पत्रकारांना उद्धट वागणूक दिली.

आसीनगरझोनमध्ये फेरमतमोजणीची मागणी अधिकाऱ्यांनी फेटाळली
आसीनगर झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक २, ३ व ६ या प्रभागाची मतमोेजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह ठवरे कॉलनी येथे करण्यात आली. रात्री ८.३० वाजेपर्यंत ही मतमोजणी चालली. दरम्यान प्रभाग क्रमांक ३ अ मधून भाजपचे विजय ऊर्फ बंडू पारवे व याच प्रभागातून ड प्रवर्गात अपक्ष सुरेखा तळवेकर या अतिशय कमी मताच्या फरकाने पराभूत झाल्या. याशिवाय प्रभाग ६ ड मधून मुस्लीम लीगचे खान असलम रशीद यांनाही कमी मताने पराभव पत्करावा लागला.
यामुळे या तिघांनीही प्रत्येक प्रभागाच्या मतमोजणीच्या वेळी फेरमतमोजणीची मागणी केली. परंतु झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत काळे यांनी मात्र या तिघांचीही मागणी फेटाळून लावली. असलम खान व त्यांचे समर्थक तर रात्री उशिरापर्यंत झोन कार्यालयात तळ ठोकून होते. इतर ठिकाणी फेरमतमोजणीची मागणी मान्य झाली, तर येथे का नाही, असा त्यांचा प्रश्न होता. परंतु त्यांच्या प्रश्नाचे कुणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.

Web Title: Planning missed, results removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.