विदर्भात कोरोनाबाधितांकडून पुन्हा प्लाझ्माची ‘डिमांड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 09:36 PM2021-03-20T21:36:21+5:302021-03-20T21:37:50+5:30
Nagpur news आता पुन्हा विदर्भात कोरोना संसर्गाचा फैलाव वाढल्याने प्लाझ्मा थेरपीची मागणी वाढली आहे. दिवसाकाठी २५ ते ३० प्लाझ्माची मागणी होत असल्याचे रक्तपेढ्यांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना झाल्यावर अँटी-व्हायरल उपचार नाहीत. यामुळे दरम्यानच्या काळात ‘कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा’ थेरपीने एक नवीन उमेद जागविली होती. वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेत याबाबत अधिक संशोधनासाठी ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ प्रकल्प हाती घेतला. परंतु कोरोनाबाधितांचे मृत्यू रोखण्यास प्लाझ्मा थेरपी अपयशी ठरत असल्याचे दिसताच हा प्रकल्प बंद केला. परंतु आता पुन्हा विदर्भात कोरोना संसर्गाचा फैलाव वाढल्याने प्लाझ्मा थेरपीची मागणी वाढली आहे. दिवसाकाठी २५ ते ३० प्लाझ्माची मागणी होत असल्याचे रक्तपेढ्यांचे म्हणणे आहे. परंतु त्या तुलनेत रक्तदाते मिळत नसल्याने अडचणी वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
मेडिकलमध्ये ‘प्लाझ्मा थेरपी’ची ट्रायल जून महिन्यात सुरू झाली. कोविड विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील रक्तद्रव वेगळा करून तो संसर्ग झालेल्या रुग्णांना देण्याची ही चाचणी होती. हा प्रकल्प राज्यातील २१ रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आला होता. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या ४७२ रुग्णांवर चाचणी केली जाणार होती. यामुळे जगातील पहिला व सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला गेला. ‘प्लाझ्मा डोनेशन’, ‘प्लाझ्मा बँक’, ‘प्लाझ्मा ट्रायल’ आणि ‘इमर्जन्सी ऑर्थरायझेशन’ या चार सुविधांचाही समावेश या प्रकल्पामध्ये करून संकलित माहितीचे विश्लेषण केले जाणार होते. परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये ‘आयसीएमआर’ने प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रभावी ठरत नसल्याचे आपल्या अभ्यासाद्वारे स्पष्ट केले. तेव्हापासून ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. याच काळात मेडिकलनेही चाचणी थांबविण्यात येत असल्याचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सोपवून प्रकल्प बंद केला. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताच ‘कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा’च्या मागणीत वाढ झाली आहे. दिवसाकाठी २५ वर प्लाझ्माची मागणी होत असल्याचे खासगी रक्तपेढ्यांचे म्हणणे आहे.
-‘आरबीडी प्लाझ्मा’ची मागणी वाढली
कोरोनाबाधितांमध्ये ‘आरबीडी’ प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत असल्याने मागील वर्षी कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात रोज ५० वर प्लाझ्माची मागणी होत होती. परंतु नोव्हेंबरपासून रुग्णसंख्या कमी होताच ही मागणी दिवसाला एक बॅगवर आली. आता पुन्हा मागणी वाढली आहे. दिवसाला २५ वर ‘आरबीडी प्लाझ्मा’बॅगची मागणी होत आहे. ज्यांनी कोरोनावर मात केली अशा दात्यांनी कोरोनाबाधितांसाठी प्लाझ्मा दान करावे.
- डॉ. हरीश वरभे
संचालक, लाईफ लाईन रक्तपेढी
मागणी वाढली, पण दाते नाहीत
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली होती. यामुळे ‘कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा’उपलब्ध करून देणेही बंद केले होते. फेब्रुवारीपासून पुन्हा प्लाझ्माच्या मागणीत वाढ झाली. सद्यस्थितीत रोज १५ ते २० बॅगची मागणी होत आहे. परंतु कोरोना होऊन गेलेले रक्तदाते प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत नसल्याने, ही मागणी पूर्ण करणे शक्य होत नाही. रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी अशा दात्यांनी समोर येणे गरजेचे झाले आहे.
- अशोक पत्की
सचिव, डॉ. हेडगेवार रक्तपेढी