नागपुरात १८ वर्षीय विद्यार्थ्याचे प्लाझ्मादान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 10:35 PM2021-04-29T22:35:18+5:302021-04-29T22:37:03+5:30
Plasma donation कोरोनामुळे प्लाझ्माची मागणी वाढली असून आवश्यक त्या संख्येत दाते समोर येत नसल्याचे चित्र आहे. परंतु स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या १८ वर्षीय श्रीनाथ प्रफुल्ल साबळे या विद्यार्थ्याने प्लाझा दान करत एका रुग्णाचे प्राण वाचवायला मदत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे प्लाझ्माची मागणी वाढली असून आवश्यक त्या संख्येत दाते समोर येत नसल्याचे चित्र आहे. परंतु स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या १८ वर्षीय श्रीनाथ प्रफुल्ल साबळे या विद्यार्थ्याने प्लाझा दान करत एका रुग्णाचे प्राण वाचवायला मदत केली.
अमरावती येथे शिक्षण घेणारा श्रीनाथ नागपूरचा आहे. त्याला मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यातून बरादेखील झाला. त्याला एका रुग्णासाठी तातडीने प्लाझ्मा हवा आहे, असा फोन एका रक्तपेढीतून गेला.
एक व्यक्तीच्या प्लाझ्मामुळे कोरोना रुग्णाला जीवनदान मिळू शकते. त्यामुळे श्रीनाथने आपल्या वडिलांना त्याची माहिती दिली. १८ वर्षाचा झाल्यावर एकदाही रक्तदान केले नसले तरी एक जबाबदार नागरिक म्हणून प्लाझ्मा दान करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याचे वडील व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनीदेखील त्याला प्रोत्साहन दिले. त्यानंतर तातडीने श्रीनाथने प्लाझ्मा दान केले. मी रक्तदान केले नसले तरी प्लाझ्मा दानाने सुरुवात केल्याचे समाधान आहे. यानंतर नियमितपणे प्लाझ्मा व रक्तदान करेन, असा मानस त्याने व्यक्त केला.