कोरोनात प्लाझ्मा थेरपी जीवनरक्षक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:12 AM2021-04-30T04:12:29+5:302021-04-30T04:12:29+5:30

मेहा शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे रुग्णांचे गंभीर होण्याचे प्रमाण वाढले असताना त्यांना वाचविण्यासाठी अनेकांकडून प्लाझ्मा थेरपीचा ...

Plasma therapy in corona is not life-saving | कोरोनात प्लाझ्मा थेरपी जीवनरक्षक नाही

कोरोनात प्लाझ्मा थेरपी जीवनरक्षक नाही

googlenewsNext

मेहा शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनामुळे रुग्णांचे गंभीर होण्याचे प्रमाण वाढले असताना त्यांना वाचविण्यासाठी अनेकांकडून प्लाझ्मा थेरपीचा आग्रह धरण्यात येत आहे. परंतु ही थेरपी जीवरक्षक नसून यामुळे जीव वाचतीलच असे नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह देशातील विविध संस्थांकडून प्लाझ्मा थेरपीवर संशोधन करण्यात आले. यात ही थेरपी फारशी प्रभावी नसल्याची बाब समोर आली आहे. आम्ही मेडिकलमध्ये प्लाझ्मा थेरपीचा उपयोग बंद केला आहे. त्याचा फारसा प्रभाव नाही. तरीदेखील इतर डॉक्टर्स या थेरपीचा सल्ला का देत आहेत, असे प्रतिपादन मेडिकलच्या डॉ. दीप्ती चंद यांनी केले.

कोरोनाबाधितांना वाचविण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ हरतऱ्हेने प्रयत्न करत आहेत. जर प्लाझ्मा उशिरा देण्यात आला तर त्याचा प्रभाव दिसून येत नाही. सुरुवातीला याचा उपयोग केला तर काही प्रमाणात ही थेरपी प्रभावी आहे. या थेरपीमुळे कोरोनाची गंभीरता कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र या मुद्द्यावर सखोल संशोधनाची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. जय देशमुख यांनी व्यक्त केले.

रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्माचा प्रचंड तुटवडा आहे. यामुळे रक्तपेढ्यांमध्येदेखील चिंतेचे वातावरण आहे. लोक प्लाझ्मा दान करण्यासाठी स्वतःहून समोर येत नाहीत. मागणी फार जास्त आहे. आयसीएमआरच्या नियमावलीनुसार एका व्यक्तीला केवळ २ बॅग देता येतात. मात्र डॉक्टर्स दिवसाला सहा बॅग्जची मागणी करत आहेत. पहिली बॅग पहिल्या दिवशी व दुसरी बॅग २४ तासानंतर देता येते, असे हेडगेवार रक्तपेढीचे डॉ. अशोक पत्की यांनी सांगितले. दुर्मिळ रक्तगटातील प्लाझ्माचे प्रमाण तर फारच कमी आहे. लोक त्यांच्या नातेवाइकांना प्लाझ्मा दान करण्यासाठी आणत आहेत. मात्र मागणी जास्त असल्याने साठा कमी आहे, असे जीवनज्योती रक्तपेढीच्या डॉ. शीला मुंधडा यांनी सांगितले.

Web Title: Plasma therapy in corona is not life-saving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.