नागपुरात कोरोनाबाधितावर मंगळवारी प्लाझ्मा थेरपी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 10:46 PM2020-06-29T22:46:28+5:302020-06-29T22:48:20+5:30
सोमवारी दोन दात्यांनी मेडिकलच्या रक्तपेढीत प्लाझ्मा दान केले. यातील ‘ए’ पॉझिटिव्ह असलेल्या दात्याचा प्लाझ्मा मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अमरावती येथील एका रुग्णाला उद्या मंगळवारी तपासणीनंतर देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, मध्य भारतातील पहिले प्लाझ्मा थेरपी ट्रायल ठरेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोविड-१९’वर जगात कोणतेही अँटिव्हायरल उपचार उपलब्ध नाहीत. या भीषण परिस्थितीत रुग्णाच्या उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे. सोमवारी दोन दात्यांनी मेडिकलच्या रक्तपेढीत प्लाझ्मा दान केले. यातील ‘ए’ पॉझिटिव्ह असलेल्या दात्याचा प्लाझ्मा मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अमरावती येथील एका रुग्णाला उद्या मंगळवारी तपासणीनंतर देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, मध्य भारतातील पहिले प्लाझ्मा थेरपी ट्रायल ठरेल.
गंभीर लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांवरील उपचारातील सर्वात मोठा प्रकल्प प्लॅटिना प्लाझ्मा थेरपी ट्रायलचे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, औषधे व सांस्कृतिक कार्यमंत्री राजेंद्र पाटील, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, संचालक डॉ. टी. पी. लहाने यांच्यासह नागपूर मेडिकलचे अधिष्ठाता व या प्रकल्पाच्या अंमलबजावणी पथकाचे प्रमुख डॉ. सजल मित्रा, प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर अॅण्ड ट्रायल को-आॅर्डिनेटर महाराष्ट्र स्टेट डॉ. सुशांत मेश्राम, या प्रकल्पाचे इन्चार्ज व स्टेट नोडल अधिकारी डॉ. एम. फैजल, रक्तपेढीचे प्रमुख डॉ.संजय पराते यांच्यासह इतरही वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते. या प्रकल्पात राज्यातील १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये व मुंबईतील बीएमसी वैद्यकीय महाविद्यालयाच्या चार महाविद्यालये असे एकूण २१ केंद्रांवर गंभीर लक्षणे असलेल्या ५०० रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी ट्रायल सुरू होणार आहे. सर्व गंभीर रुग्णांना २०० मिलिलिटर कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्माचे २४ तासांच्या अंतरात दोन डोस दिले जातील. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्मामध्ये कोरोना विषाणूविरूद्ध अँटिबॉडी असतात. ज्यामुळे संक्रमणाविरूद्ध प्लाज्मा मिळालेल्या गंभीर रुग्णांना आजाराशी लढण्यास मदत होते. आज उद्घाटनदरम्यान शासनाने उपलब्ध करून दिलेल्या प्लाझ्मा फेरेसीस मशीनच्या मदतीने दोन दात्यांकडून प्लाझ्मा घेण्यात आला. या पूर्वी एका दात्याकडून प्लाझ्मा घेण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, आज उपलब्ध झालेल्या ‘ए’ पॉझिटिव्ह दात्याचा प्लाझ्मा मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अमरावती येथील एका गंभीर रुग्णाला देण्याची शक्यता आहे. चाचणीनंतरच प्लाझ्मा दिला जाणार आहे.