नागपुरातील प्लास्टिक बंदी, केवळ तक्रारींच्या आधारे कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 08:21 PM2019-12-26T20:21:59+5:302019-12-26T20:22:39+5:30
नागपुरात प्लास्टिक बंदी केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहेत. अधिकारी केवळ तक्रारींच्या आधारे कारवाई करीत असल्याची बाब पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात प्लास्टिक बंदी केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहेत. अधिकारी केवळ तक्रारींच्या आधारे कारवाई करीत असल्याची बाब पुढे आली आहे. बाजारपेठांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. उल्लेखनीय बाब अशी की, या प्रकरणी आतापर्यंत निगराणीसाठी संबंधित विभागाकडे कोणतीही व्यवस्था नाही.
पाच हजारांचा दंड
माऊंट रोड परिसरातील आयसीआयसीआय बँकेच्या करन्सी विभागात नोटांच्या बंडलच्या पॅकिंगसाठी प्रतिबंधित प्लास्टिकचा सर्रास उपयोग करण्यात येत असल्याची तक्रार मंगेश अढाऊ यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती. त्यानंतर अशीच तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे केली होती. एक महिन्यानंतर बोर्डाच्या चमूने कारवाई करून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले. या प्रकरणी बोर्डाने बँकेला नोटीस देऊन पाच हजार रुपयांचा दंड आकारला आहे.
बोर्ड आणि रिझर्व्ह बँकेन द्यावे लक्ष
आयसीआयसीआय बँकेच्या करन्सी विभागाविरुद्ध तक्रार करणारे मंगेश अढाऊ यांच्यानुसार शहरातील अनेक बँका आणि बाजारपेठांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा सर्रास उपयोग करण्यात येत आहे. बँकांच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्वत:हून लक्ष द्यावे. याशिवाय प्रतिबंधित प्लास्टिकच्या उपयोगाची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने स्वतंत्र व्यवस्था तयार करावी. नियम धाब्यावर बसवून प्रतिबंधित प्लास्टिकचा उपयोग सर्रास होतो. कारवाई केवळ तक्रारींच्या आधारे होते. अधिकारी स्वत:हून कोणतीही कारवाई करीत नाहीत.