प्लास्टिक बॅन अशक्यच! रिसायकल व नियाेजन आवश्यक; तज्ज्ञांचे स्पष्ट मत

By निशांत वानखेडे | Published: June 5, 2023 06:54 PM2023-06-05T18:54:13+5:302023-06-05T18:54:37+5:30

Nagpur News प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण, वापरलेल्या प्लास्टिकचे नियाेजन आणि पुनर्वापरासाठी रिसायकल करणे, हेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून उपाययाेजना कराव्या लागतील, असे स्पष्ट मत प्लास्टिक रिसायकल क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Plastic ban impossible! recycling and disposal requirements; Clear opinion of experts | प्लास्टिक बॅन अशक्यच! रिसायकल व नियाेजन आवश्यक; तज्ज्ञांचे स्पष्ट मत

प्लास्टिक बॅन अशक्यच! रिसायकल व नियाेजन आवश्यक; तज्ज्ञांचे स्पष्ट मत

googlenewsNext

निशांत वानखेडे
नागपूर : प्लास्टिकवर बंदी लावण्याचा कितीही दावा केला तरी हे पाऊल प्रभावी ठरेल, हे शक्य नाही. त्याऐवजी प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण, वापरलेल्या प्लास्टिकचे नियाेजन आणि पुनर्वापरासाठी रिसायकल करणे, हेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून उपाययाेजना कराव्या लागतील, असे स्पष्ट मत प्लास्टिक रिसायकल क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्लास्टिकच्या पुनर्प्रक्रियेवर परिसंवाद आयाेजित करण्यात आला. याप्रसंगी विभागीय उपायुक्त (विकास) कमलकिशाेर फुटाणे, प्लास्टिक न्युट्रॅलिटी रिसायकल इंडियाच्या वरिष्ठ व्यवस्थापक रचना गंपा, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक आर. एम. क्षीरसागर, नीरीचे संचालक डाॅ. अतुल वैद्य, नीरीच्या वैज्ञानिक डाॅ. रिता धापाेडकर प्रामुख्याने उपस्थित हाेते. कमलकिशाेर फुटाणे यांनी ‘माझी वसुंधरा कॅम्पेन ४.०’ सह पर्यावरण संवर्धनाबाबत राज्य शासनाच्या विविध याेजनांची माहिती दिली. आर. क्षीरसागर यांनी सरकार प्लास्टिक वापर आणि कचऱ्याच्या नियाेजनासाठी वेगवेगळ्या उपाययाेजना राबवित आहे, मात्र आणखी माेठा टप्पा गाठायचा असून प्लास्टिक विराेधी लढाईत नागरिकांनी जबाबदारी घेण्याची गरज व्यक्त केली. संचालन डाॅ. देबीश्री खान यांनी केले, तर वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ. प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.

दरराेज २६ हजार टन निघते, ८ टक्केच रिसायकल : धापाेडकर
डाॅ. रिता धापाेडकर यांनी देशात प्लास्टिकच्या स्थितीची भीषणता अधाेरेखित केली. देशात दरराेज २६,००० टन प्लास्टिकचा कचरा निघताे. त्यातून केवळ ८ टक्के रिसायकल हाेताे, २९ टक्क्यांवर चुकीचे नियाेजन हाेते आणि उरलेला कचरा जलसाठे आणि अन्नसाखळीत मिसळताे. या सरळ अर्थकारणाला खंडित करून चक्राकार अर्थकारणात रूपांतरित करण्याची गरज आहे. प्लास्टिकचा सातत्याने पुनर्वापर करणारी चक्राकार इकाॅनाॅमी विकसित करण्याचा राेडमॅप तयार हाेत असल्याचे सांगत पुढच्या काही दशकात भारतातील कचरा व्यवस्थापन, पुनर्प्रक्रिया क्षमता, डिजिटल प्लॅटफार्म, जागृती व प्रशिक्षणाला मजबुती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केदारनाथ पॅटर्न प्रभावी ठरेल : गंपा

रचना गंपा यांनी प्लास्टिकवर बंदी लादणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत रिसायकल हा माेठा पर्याय असल्याचे सांगितले. देशात दर मिनिटाला १० लक्ष प्लास्टिक बाॅटल खरेदी केल्या जातात. दरराेज ४०५९ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा बाहेर निघताे. यावर नियंत्रणासाठी लाेकांच्या वर्तनात बदल करण्याची गरज आहे. त्यांच्या संस्थेतर्फे केदारनाथमध्ये प्लास्टिक बाॅटलसह साहित्य खरेदी करणाऱ्या भाविकांकडून प्रतिवस्तू १० रुपये शुल्क घेण्यास सुरुवात केली. ही वस्तू परत आणेल, त्याच्याकडून क्यूआर काेड स्कॅन करून त्याचे पैसे परत देण्याची माेहीम सुरू केली. या उपक्रमाला प्रचंड यश मिळाले. आता हा पॅटर्न देशात ६० पर्यटन व धार्मिक स्थळी सुरू केला असून एका महिन्यात ४० लक्ष क्यूआर काेड स्कॅन झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकारची मदत मिळाली की हा पॅटर्न देशभर राबविण्यास मदत हाेईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Plastic ban impossible! recycling and disposal requirements; Clear opinion of experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.