नागपुरात रविवारी विरघळला प्लास्टिक बंदीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 09:44 AM2018-06-25T09:44:48+5:302018-06-25T09:49:14+5:30

प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी उपराजधानीत दीड लाखावर दंड वसूल करण्यात आला. परंतु रविवारी ‘लोकमत’ने शहरातील नेहमी गजबजणाऱ्या परिसराची पाहणी केली असता सर्रास प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर सुरू असल्याचे आढळले.

Plastic ban melts on Sunday in Nagpur | नागपुरात रविवारी विरघळला प्लास्टिक बंदीचा संकल्प

नागपुरात रविवारी विरघळला प्लास्टिक बंदीचा संकल्प

Next
ठळक मुद्देविक्रेते अन् ग्राहकांकडून प्लास्टिकचा खुलेआम वापरमनपा पथकांची कारवाई थंडावली

दयानंद पाईकराव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी उपराजधानीत दीड लाखावर दंड वसूल करण्यात आला. परंतु रविवारी ‘लोकमत’ने शहरातील नेहमी गजबजणाऱ्या सीताबर्डी मार्केट, गोकुळपेठ, सक्करदरा, महाल परिसराची पाहणी केली असता या भागात सर्रास प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर सुरू असल्याचे आढळले. विक्रेते खुलेआम ग्राहकांना प्लास्टिकच्या कॅरीबॅग देत होते. तर ग्राहकही हातात कॅरीबॅग घेऊन फिरताना आढळले. या भागात महापालिकेच्या पथकातील कर्मचारी कारवाई करताना आढळले नाही. त्यामुळे प्लास्टिक बंदीला रविवारी सुटी तर दिली नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला होता.
महापालिकेच्या पथकाने काही भागात थातुरमातूर कारवाई केली. फक्त २५.७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. २ जणांना नोटीस बजावून फक्त ८ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. महापालिकेचे पथकच आज कारवाईच्या मूडमध्ये नसल्याचे पहायला मिळाले. काही ठिकाणी तर पथकाने विक्रेत्यांना समज देऊन सोडूनही दिले.
सरकारने २३ जूनपासून प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घातली आहे. बंदीच्या पहिल्याच दिवशी महापालिकेच्या पथकांनी दहाही झोनमध्ये कारवाई करून १ लाख ५५ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. परंतु रविवारी अगदी विपरीत परिस्थिती शहरातील बाजारपेठांमध्ये पहावयास मिळाली. सीताबर्डी, महाल, गोकुळपेठ, सक्करदरा येथील बाजारपेठात सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू होता. रस्त्यावरील हॉकर्सकडे सर्व वस्तू प्लास्टिकच्या वेष्टनात विक्रीस ठेवलेल्या आढळल्या. यात छत्र्या, चप्पल, पायमोजे, पर्स, नाडे, भांडे घासणी, स्प्रे, घड्याळ, सौंदर्य प्रसाधने, वॉटर बॅग, चटई, बेबी वॉकर, बेल्ट, बांगड्या, फिंगर, अगरबत्ती, पाणी पुरी आदी वस्तू प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आढळल्या. तर पाऊस आल्यास वस्तू झाकण्यासाठी विक्रेत्यांनी प्लास्टिकचे कव्हर खुलेआमपणे दुकानात ठेवलेले आढळले. विक्रेते ग्राहकांना वस्तू खरेदी केल्यानंतर ती प्लॉस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये टाकून देत होते. तर ग्राहकही प्लास्टिकच्या कॅरीबॅग हातात घेऊन फिरताना आढळले. यात कोठेही आपल्यावर दंडात्मक कारवाई होईल, अशी भीती ग्राहक, विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर दिसली नाही. रविवारी सर्वच शासकीय कार्यालयांना सुटी असते. त्यामुळे प्लास्टिक बंदीला तर रविवारी सुटी दिली नसेल, असा प्रश्न अनेकांना पडला.

काही ग्राहकांकडे कापडी पिशव्या
रविवारी शहरातील बाजारपेठांमध्ये सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू होता. परंतु काही जागरूक ग्राहकही बाजारात आढळले. प्लास्टिक बंदी झाल्याचे माहिती असल्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी त्यांनी खबरदारी घेतली होती. घरून निघतानाच त्यांनी कापडी पिशव्या सोबत आणून त्यात खरेदी केलेले साहित्य टाकल्याचे दिसून आले.

फळ, भाजीपाला, फूल विक्रेत्यांकडेही प्लास्टिकच
सीताबर्डी, गोकुळपेठ परिसरात फूल, फळ विक्रेते आणि भाजीपाला विक्रेतेही प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर करताना आढळले. यात अनेक ग्राहकांनीही खरेदी केलेली फळे, भाजीपाला घरी नेण्यासाठी विक्रेत्यांकडून कॅरीबॅग घेतल्याचे दिसले.

Web Title: Plastic ban melts on Sunday in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.