नागपुरात प्लास्टिक व्यापाऱ्यावर हल्ला : संतप्त व्यापाऱ्यांची पोलीस ठाण्यावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:09 AM2018-12-07T00:09:30+5:302018-12-07T00:11:57+5:30
कार पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून मनीष जैन नामक प्लास्टिक व्यापाऱ्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यावर धडक दिली. आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी प्रचंड संख्येत जमलेल्या संतप्त व्यापाऱ्यांनी घोषणाबाजी केल्याने लकडगंज ठाण्याच्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. प्रसंगावधान राखत परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर यांनी प्रकरण हाताळल्याने तणाव निवळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कार पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून मनीष जैन नामक प्लास्टिक व्यापाऱ्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यावर धडक दिली. आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी प्रचंड संख्येत जमलेल्या संतप्त व्यापाऱ्यांनी घोषणाबाजी केल्याने लकडगंज ठाण्याच्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. प्रसंगावधान राखत परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर यांनी प्रकरण हाताळल्याने तणाव निवळला.
जैन आज दुपारी परवारपुरा येथील जैन मंदिरात दर्शनाला आले होते. ते त्यांची कार नगरसेविका आभा पांडे यांच्या कार्यालयासमोर पार्क करीत असताना तेथील कर्मचारी विक्की चौधरी आणि पांडे यांचे वाहनचालक ललित पटेल यांनी मनीष जैन यांच्यासोबत अरेरावी करून त्यांना तातडीने कार हटविण्यास सांगितले. त्यावरून बाचाबाची सुरू असतानाच विक्की आणि ललितने मनीष यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. ही माहिती कळताच मनीष यांचे मित्र तसेच मोठ्या संख्येत व्यापारी लकडगंज ठाण्यासमोर धडकले. मनीष यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करा, अशी त्यांची मागणी होती.
लकडगंज पोलीस त्यांची समजूत काढत असतानाच विक्की चौधरीचे वकील पोलीस ठाण्यात पोहचले. ते पाहून मनीष यांच्या सहकाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या. त्यांनी ठाण्याच्या आवारात वकिलाला घेराव करून जोरदार घोषणाबाजी केल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. ही माहिती कळताच परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर तातडीने लकडगंज ठाण्यात पोहचले. त्यांनी प्रसंगावधान राखत बाजूच्या पोलीस ठाण्यातून अतिरिक्त पोलीस दल मागवून घेतले तसेच तक्रार द्या, लगेच कारवाई करू, असे आश्वासन देत व्यापाऱ्यांना शांत केले.
परस्परांविरुद्ध तक्रारी
त्यानंतर मनीष यांनी विक्की चौधरी तसेच ललित पटेल विरुद्ध हल्ला करून सोनसाखळी लुटल्याची तसेच धार्मिक भावना भडकविणारी शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदवली. हे कळताच विक्की चौधरीने आपल्या साथीदारांसह लकडगंज पोलिसांकडे पोहचून मनीष तसेच त्यांच्या साथीदारांविरुद्ध मारहाण करून धमकी दिल्याची तक्रार नोंदवली. पोलीस दोन्ही तक्रारींची शहानिशा करीत होते.