नागपुरात दोन हजारांवर प्लास्टिक पतंग जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 11:27 PM2020-01-14T23:27:08+5:302020-01-14T23:28:46+5:30
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने एकाच दिवशी सुमारे दोन हजारांवर प्लास्टिक पतंग आणि २५ चक्री नॉयलॉन मांजा जप्त केला. सुमारे ७७ दुकानांची तपासणी करून १३ हजारांचा दंड वसूल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नॉयलॉन मांजामुळे अपघात होण्याचा धोका असतो. याचा विचार करता मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या नॉयलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंग विक्री करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मोहीम हाती घेतली आहे. पथकाने विक्रेत्यांकडून एकाच दिवशी सुमारे दोन हजारांवर प्लास्टिक पतंग आणि २५ चक्री नॉयलॉन मांजा जप्त केला. सुमारे ७७ दुकानांची तपासणी करून १३ हजारांचा दंड वसूल केला.
सतरंजीपुरा झोनअंतर्गत झालेल्या कारवाईत नॉयलॉन मांजाच्या २५ चक्री जप्त करण्यात आल्या. तसेच दुकानदारांकडून ६०० प्लास्टिक पतंग जप्त केल्या. आठ दुकानदांकडून तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनमधील १५ दुकानांची तपासणी करण्यात आली. यात २५ प्लास्टिक पतंग जप्त करुन एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. धरमपेठ झोनमध्ये पाच दुकानातून ५०० पतंग जप्त करुन पाच हजारांचा दंड वसूल केला. धंतोली झोनमध्ये ९ दुकानांच्या तपासणीत ३०० पतंग जप्त क रुन चार हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. नेहरूनगरमध्ये २५ पतंग, गांधीबागमध्ये ३२ पतंग, लकडगंजमध्ये ६४६ पतंग अशा एकूण ७७ दुकानांच्या तपासणीदरम्यान २१२८ प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आल्या.
१२ दिवसात ६० हजारांवर दंड
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने ३ जानेवारी ते १४ जानेवारी या काळात ७५८ दुकानांची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान सुमारे ४४६९ प्लास्टिक पतंग व ४० चक्री नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आल्या. विक्रे त्यांवर ६० हजार ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
थुंकणाऱ्या १५ जणांवर कारवाई
पथकाने सोमवारी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या१५ जणांवर कारवाई करून तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला. . सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या १० जणांकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आली असल्याची माहिती उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांनी केली.
मेट्रो रेल्वे मार्गाजवळ पतंग उडविणे धोकादायक
महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पांतर्गत सीताबर्डी इंटरचेज ते खापरी मेट्रो स्टेशन आणि पुढे मिहान डेपो पर्यंत मेट्रो ट्रेनचे नियमित संचालन सुरु आहे. तसेच हिंगणा मार्गावर (सीताबर्डी ते लोकमान्य नगर आणि पुढे हिंगणा डेपो पर्यंत) गरजेप्रमाणे आणि अंतर्गत कामानिमित्त मेट्रो ट्रेनचे संचालन होते. मेट्रो ट्रेनचे संचालन २५००० व्होल्ट विद्युत प्रवाहाच्या माध्यमाने होतो. ट्रेनच्या संचालनाकरिता विद्युत प्रवाह सुरु असतो व पतंगीचा मांजा या विद्युत तारांमध्ये अडकल्यास यातून प्रवाहित होणारा करंट पतंग उडविणाऱ्या व्यक्ती पर्यत पोहोचू शकतो आणि यातून दुर्घटना होण्याचा धोका आहे. तसेच पतंग व मांजा अडकल्याने मेट्रो सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.त्यामुळे मेट्रो रेल मार्गाच्या जवळ पतंग उडवू नये. असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.