नागपुरात प्लास्टिकबंदीला वाटाण्याच्या अक्षता : पतंगांची जोरदार विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 09:10 PM2018-12-24T21:10:56+5:302018-12-24T21:56:08+5:30
प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, साठवणीवर पूर्णत: बंदी आहे. प्लास्टिकपासून बनलेल्या ज्या वस्तूंचे विघटन होत नाही, अशा वस्तू वापरण्यास मनाई केली आहे, असे असताना बाजारात व वस्त्या-वस्त्यांमध्ये पॉलिथीनच्या पतंगांची जोरदार विक्री सुरू आहे. प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेबरोबर सर्व सरकारी कार्यालयांना आदेश आहेत. मात्र डोळ्यादेखत सुरू असलेल्या या विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत बंदीलाच वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, साठवणीवर पूर्णत: बंदी आहे. प्लास्टिकपासून बनलेल्या ज्या वस्तूंचे विघटन होत नाही, अशा वस्तू वापरण्यास मनाई केली आहे, असे असताना बाजारात व वस्त्या-वस्त्यांमध्ये पॉलिथीनच्या पतंगांची जोरदार विक्री सुरू आहे. प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेबरोबर सर्व सरकारी कार्यालयांना आदेश आहेत. मात्र डोळ्यादेखत सुरू असलेल्या या विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत बंदीलाच वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे चित्र आहे.
मकरसंक्रांत २० दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे बच्चेकंपनीसोबतच मोठ्यांमध्ये पतंगबाजीचे वारे वाहू लागले आहे. यातच नाताळाच्या सुट्या लागल्याने गच्चींवर ओ काट... ढिल दे रे... चकरी पकड...कटली रे पतंग... अशी आरडाओरड वाढली आहे. चौका-चौकामध्येही पंतग व मांजाची दुकाने सजू लागली आहेत. दुकानांमध्ये विविध रंगात व आकारात असलेल्या पंतगी लक्ष वेधून घेत आहेत. विशेषत: पॉलिथीनच्या पतंगीवर हवे ते छापणे शक्य आहे. यामुळे लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असलेला छोटा भीम, डोरेमॉन ते ‘रोबोट-२’ चित्रपटाचे पोस्टर असलेल्या पतंगी आल्या आहेत. पॉलिथीनच्या पतंगी या कागदी पतंगाच्या तुलनेत स्वस्त व लवकर फाटत नाही. हातोहात विक्रीही होत असल्याने मोठा साठा बाजारात उपलब्ध झाला आहे. परंतु पॉलिथीनच्या या विक्रीकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांपासून ते कारवाईचे अधिकार असलेल्या विविध विभागींचे दुर्लक्ष झाले आहे. मार्च २०१८ पासून राज्य सरकारने प्लास्टिक उत्पादन, त्यांचा वापर, विक्री आणि वाहतुकीवर बंदी आणली आहे. परंतु ही बंदी नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे.
प्लास्टिकची धडाक्यात विक्री
मोठ्या दुकानांपासून ते आता भाजी, फूल, मटन, मासे, चिकन विक्रेत्याकडून बंदी असलेल्या ५० मायक्रॉन कॅरीबॅग्जचा सर्रास वापर करत आहेत. हॉटेलमध्ये अन्नपदार्थांच्या पार्सलसाठी प्लास्टिक बॅग्जचा वापर होत आहेत. आता यात पॉलिथीनच्या पतंगांची भर पडल्याने, बंदी कुठे आहे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
प्लास्टिक बॅग्जपासून होणारे पर्यावरणाचे नुकसान आज सर्वांनाच माहीत आहे. जगात आज निव्वळ प्लास्टिकच्या वापरापासून होत नसेल इतकं नुकसान केवळ प्लास्टिक बॅगच्या वापरामुळे होत आहे. प्लास्टिकची पिशवी निर्माण झाल्यानंतर ती नष्ट होण्यासाठी सुमारे हजारेक वर्ष लागतात. एकदा निर्माण झालेले प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही. याउलट त्याचे तुकडे पडून ते इतरत्र जमिनीत, समुद्रात, नदीनाल्यात मिसळत जाऊन ते प्राण्यांच्या तोंडी येतात. काही वेळेस असे प्राणी मनुष्याच्या पोटात गेल्यावर याच प्लास्टिकचा अंश आपल्याही पोटात जात असतो. काही प्लास्टिक पिशव्या या इतक्या पातळ असतात की त्यांचा फक्त एकदाच कसाबसा वापर होऊ शकतो. या पिशव्या २० मायक्रॉनपेक्षा कमी असतात. पॉलिथिन पतंगाची जाडीही एवढ्याच मायक्रॉनची राहत असल्याने चिंतेचे कारण ठरले आहे. यावर कारवाई होणे आवश्यक आहे.
कौस्तुभ चॅटर्जी
संस्थापक, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन