मेडिकलमधील प्लेटलेट्स बॅग उसनवारीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:10 AM2021-09-06T04:10:44+5:302021-09-06T04:10:44+5:30
नागपूर : डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना व गंभीर रुग्णांना तातडीने प्लेटलेट्स द्यावे लागत असताना मेयो, मेडिकलमध्ये प्लेटलेट्स बॅग नसल्याचे ...
नागपूर : डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना व गंभीर रुग्णांना तातडीने प्लेटलेट्स द्यावे लागत असताना मेयो, मेडिकलमध्ये प्लेटलेट्स बॅग नसल्याचे कारण देऊन रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, तातडीने बॅग विकत घेण्यासाठी पुढाकार न घेतल्याने मेडिकलवर एका खासगी रक्तपेढीतून ३० ते ३५ बॅग उसनवारीवर घेण्याची वेळ आली.
मेयो, मेडिकलमध्ये केवळ विदर्भच नाही तर आजूबाजूच्या राज्यातून मोठ्या अपेक्षेने रुग्ण येतात. परंतु, सरकार वेळेवर सोयी देत नसल्याने व स्थानिक पातळीवर वस्तू खरेदीला मर्यादा असल्याने रुग्णसेवा प्रभावित होत असल्याचे चित्र आहे. सध्या डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. या आजारात झपाट्याने प्लेटलेट्स कमी होतात. साधारण १७ हजारांखाली आलेल्या रुग्णांना प्लेटलेट्स दिल्या जातात. परंतु, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेडिकलमध्ये मागील २५ दिवसांपासून प्लेटलेट्स देण्यासाठी बॅगच नाही. मेयोमध्येही हीच स्थिती आहे. तातडीने बॅग विकत घेण्यासाठी दोन्ही रुग्णालय प्रशासनाने पुढाकारही घेतला नाही. परिणामी, रुग्णांना खासगी रक्तपेढीतून प्लेटलेट्स विकत घेण्याची वेळ आली आहे. नामुष्की टाळण्यासाठी मेडिकलने दोन दिवसांपूर्वी एका खासगी रक्तपेढीतून ३० ते ३५ प्लेटलेट्सच्या पिशव्या उसनवारीवर आणल्याची माहिती आहे.
प्लेटलेट्सअभावी मृत्यू झालेल्या रुग्णांची जबाबदारी कुणावर?
मेयो, मेडिकलमध्ये मोठ्या संख्येत डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. इतरही आजाराच्या रुग्णांना प्लेटलेट्सची गरज भासते. येथे येणारा रुग्णही गरीब असतो. यामुळे प्रत्येकाला खासगीमधून प्लेटलेट्स विकत घेता येत नाही. अशा रुग्णांचा प्लेटलेट्सअभावी मृत्यू झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न आहे.
मेयोने विकत घेतल्या हजार बॅग
बॅगच्या अभावी मागील काही दिवसांपासून मेयोची रक्तपेढी बंद असल्यासारखी होती. अखेर शनिवारी मेयो प्रशासनाने हजार बॅग विकत घेतल्या. परंतु, या बॅग साधारण दोन महिने चालतील. यामुळे पुन्हा हीच स्थिती येऊ नये यासाठी आतापासून साठा करून ठेवणे गरजेचे आहे.
मेडिकलने बॅगसाठी काढली निविदा
प्राप्त माहितीनुसार, मेडिकलने प्लेटलेट्सच्या बॅग विकत घेण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. याला १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पुढील आठवड्यात बॅग उपलब्ध होण्याची शक्यता आहे. बॅगचा तुटवडा पहिल्यांदाच झाल्याचेही बोलले जात आहे.