रंग खेळा, मात्र जपून : डॉक्टरांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:25 PM2019-03-18T23:25:43+5:302019-03-18T23:26:43+5:30
‘बुरा न मानो होली है.’ म्हणत लाल, हिरवा, निळा, गुलाबी अशा विविध रंगांची उधळण होळीच्या निमित्ताने केली जाते. अतिउत्साहात या रंगांची उधळण मुक्तहस्ताने होताना नेहमीच दिसते. मात्र, हा अतिउत्साह काही जणांना घातक ठरू शकतो, म्हणूनच होळी खेळा, पण जपून असा सल्ला मेडिकलच्या नेत्ररोग विभागातील डॉक्टरांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘बुरा न मानो होली है.’ म्हणत लाल, हिरवा, निळा, गुलाबी अशा विविध रंगांची उधळण होळीच्या निमित्ताने केली जाते. अतिउत्साहात या रंगांची उधळण मुक्तहस्ताने होताना नेहमीच दिसते. मात्र, हा अतिउत्साह काही जणांना घातक ठरू शकतो, म्हणूनच होळी खेळा, पण जपून असा सल्ला मेडिकलच्या नेत्ररोग विभागातील डॉक्टरांनी दिला आहे.
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीला रंग खेळण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात रंगांची खरेदी होताना दिसत आहे. रंगांमध्ये वापरण्यात येणारे केमिकल्स हे कुठचे आहेत, किती प्रमाणात वापरलेत याची नोंद रंगांच्या पाकिटावर नसते. ग्राहकही हे रंग खरेदी करताना ते कशापासून तयार केले आहेत, कुठे तयार केले आहेत याचा विचार करताना दिसत नाहीत. याचा परिणाम धुळवडीला रंग खेळल्यावर दिसून येतो. जास्त केमिकल्स रंगांमध्ये असल्यास त्वचा, डोळे, कान, घसा यांना त्रास होऊ शकतो. दरवर्षी धुळवडीनंतर डोळ्याला इजा झालेले, कानाला इजा झालेले रु ग्ण रु ग्णालयात दाखल होतात. रासायनिक कारणामुळे डोळ्यात होणाऱ्या इजांमध्ये १८ टक्के प्रमाण हे होळी हलगर्जीपणे खेळण्यामुळे होतात. कोणत्याही सणाचा आनंद लुटा; मात्र, या आनंदाचा बेरंग होऊ देऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी लोकांना दिला आहे. रंगांमुळे त्वचेवर पुरळ उठणे, त्वचेला खाज सुटणे, डोळे लाल होणे, कान सुजणे असा त्रास लोकांना होतो. काही जणांना यामुळे डोळे गमवावे लागतात तर काही जणांना कानाच्या पडद्याचा त्रास होतो. म्हणून नैसिर्गक किंवा साध्या रंगांचा वापर करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
रंगाचे फुगे धोकादायक
कृत्रिम रंगांमध्ये काही धोकादायक रंगद्रव्ये व पदार्थ आढळतात. यात वाळू, काच पावडर आणि शिसे यासारखे पदार्थ डोळ्यास इजा किंवा अंधत्व देऊ शकतात. चमकी असलेल्या रंगामध्ये काचेसारखे पदार्थ असतात. ज्याने बुबुळावर जखम होऊ शकते, डोळा लाल होऊ शकतो व पाणी येऊ शकते. म्हणून रंग खेळताना गॉगल लावावा. रंगांचे फुगे सर्वात जास्त धोकादायक ठरु शकतात. त्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव किंवा लेन्स सरकू शकते किंवा मागचा पडदा (रेटिना) फाटू शकतो यामुळे नजर पूर्णपणे जाऊ शकते. या आकस्मिक अपघाताकडे तातडीने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
डॉ. अशोक मदान,
विभाग प्रमुख नेत्ररोग विभाग, मेडिकल